Parabhani: पाथरीकरांचा श्वास कोंडला! पहाटे चार एकरवरील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:12 IST2025-12-22T12:11:50+5:302025-12-22T12:12:40+5:30
डम्पिंग ग्राउंडवरील सतत लागणाऱ्या आगीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Parabhani: पाथरीकरांचा श्वास कोंडला! पहाटे चार एकरवरील डम्पिंग ग्राउंडला भीषण आग
पाथरी : शहरातील नगर परिषदेच्या बाबूलतार रोडवरील डम्पिंग ग्राउंडला सोमवारी भल्या पहाटे पाच वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. सुमारे चार एकर क्षेत्रफळाचे हे संपूर्ण डम्पिंग ग्राउंड आगीच्या केंद्रस्थानी आले असून, आगीचे लोळ आणि दाट धुराचे लोट दूरवरूनही दिसून येत आहेत. तसेच बाबुलतार रस्त्यावर धुराचे लोट येत असल्याने नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे.
दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवानखुर्रम खान, शारेफ खान, बळीराम गवळी, शेरू हे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र कचऱ्याचे मोठ्या प्रमाणावरील ढिगारे , धुराचे लोट आणि कोरडा कचरा यामुळे आग नियंत्रणात आणणे अवघड ठरत आहे.
विशेष म्हणजे, फक्त दोन दिवसांपूर्वीही याच डम्पिंग ग्राउंडला आग लागली होती. त्यावेळी अग्निशामक दलाने ती आग आटोक्यात आणली होती. मात्र पुन्हा सोमवारी पहाटे मोठी आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या डम्पिंग ग्राउंडला कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. आगीमुळे परिसरात दाट धुराचे आणि धुळीचे लोट निर्माण झाले असून नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. डम्पिंग ग्राउंडवरील सतत लागणाऱ्या आगीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.