Parabhani: पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 18:30 IST2025-03-25T18:29:20+5:302025-03-25T18:30:00+5:30
Parabhani News तक्रारदाराकडून आरोपीने १० हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्याचवेळी एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

Parabhani: पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले
परभणी : कंपाऊंड वॉल आणि नाली बांधकामाच्या एमबीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या पंचायत समितीच्या शाखा अभियंत्याला १० हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
१५ व्या वित्त आयोगांतर्गत अंगणवाडी परिसरातील कंपाउंड वॉल आणि नाली बांधकाम ४२ वर्षीय तक्रारदार यांनी पूर्ण केले होते. त्याचे मोजमाप पुस्तिकेत नोंद करण्यासाठी त्यांनी पंचायत समिती येथे आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. मात्र, शाखा अभियंता अण्णासाहेब किसनराव तोडे यांनी एमबी लिहिण्यासाठी १० हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने ४ मार्च रोजी एसीबीकडे केली होती.
१८ मार्च रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपी अण्णासाहेब तोडे यांनी एमबी लिहून तक्रारदाराच्या ताब्यात दिले व सांगितले की, कामाच्या रकमेचा भरणा झाल्यानंतर १० हजार द्यावे लागतील. त्यामुळे एसीबीने त्यांच्यावर सापळा रचण्याचा निर्णय घेतला. २४ मार्च रोजी तक्रारदाराच्या बँक खात्यात संबंधित कामाच्या रकमेचा भरणा झाल्यावर सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून आरोपीने १० हजार रुपयांची मागणी करून ती रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली. त्याचवेळी एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर अण्णासाहेब तोडे यांच्याविरूद्ध नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यांचा मोबाइल ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे.
तोडे यांच्या घराची घेतली झडती
सापळा कारवाईनंतर तोडे यांच्या अंगझडतीत १० हजार रुपये लाच, १ हजार ३३० रुपये रोख आणि १ मोबाइल फोन जप्त करण्यात आला. तसेच, त्यांच्या परभणी येथील यशोधन नगरातील निवासस्थानी घरझडती घेतली असता ५८ हजार ५०० रुपये रोख आणि अंदाजे ८० ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. या यशस्वी कारवाईत पोलिस निरीक्षक माधुरी यावलीकर, एएसआय निलपत्रेवार, पोह अनिरुद्ध कुलकर्णी, सीमा चाटे, पो. अंमलदार अतुल कदम, नामदेव आदमे, जे. जे. कदम, ईश्वर जाधव, शाम गोरपल्ले यांचा समावेश होता.