ओंकार गायकवाड अपहरण, खून प्रकरण; मुख्य आरोपीच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:01 IST2025-07-18T12:00:00+5:302025-07-18T12:01:09+5:30
ग्रामीण पोलिसांनी रात्री पाठलाग करुन यशस्वी केली धाडसी मोहीम

ओंकार गायकवाड अपहरण, खून प्रकरण; मुख्य आरोपीच्या पाठलाग करून मुसक्या आवळल्या
- रेवणअप्पा साळेगावकर
सेलू (परभणी) : संबर येथील युवक ओंकार गायकवाड यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्येप्रकरणी शनिवार रात्री पासून फरार असलेल्या मुख्य आरोपी पप्पू वैद्य यास अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. गुरुवारी रात्री ११ वाजत पेडगाव शिवारात पाठलाग करीत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आधी पाच आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता मुख्य आरोपीस अटक करून महत्त्वाचा टप्पा गाठण्यात पोलिसांना यश आले आहे.
या प्रकरणात बुधवारी परभणी ग्रामीण पोलिसांनी ३ व स्थागुशाचे पो.नि.विवेकानंद पाटील यांचे पथकाने २ अशा ५ आरोपींना अटक केल्यानंतर पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली परभणी ग्रामीण पोलिसांनी मिळवलेल्या गुप्त माहिती आधारे पप्पू वैद्य हा पेडगाव शिवारात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने गुरुवारी रात्री ११ वा पेडगाव शिवारात पोलिस निरीक्षक श्रीकांत डोंगरे,पो.ह.भाऊ जाधव ,देविदास बुकरे, लोणकर यांच्या पथकाने सापळा रचला. याचा सुगावा लागताच मुख्य आरोपी पप्पू वैद्यने पळ काढला. परंतु, पोलिस पथकाने पाठलाग करत काही अंतरावर त्याला पकडण्यात यश मिळवले. आरोपीस न्यायालयात हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी दिली आहे.
आधी पाच आरोपी होते अटकेत
आर्थिक व्यवहाराच्या कारणाने संबर येथून कारने अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी मोरेगाव शिवारातील कॅनालजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणातील गंभीरतेची दखल घेत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत वैभव खेडेकर, भीमाशंकर वैद्य आणि नितीन काळे यांना अटक केली. तर स्थागुशा पथकाने हरिओम मोहिते, वेदांत पारवे यांना ताब्यात घेतले होते.
काय आहे प्रकरण
शनिवारी रात्री १०:३० वाजता संबर येथून ओंकार गायकवाड याचे पप्पू वैद्य (रा. बोबडे टाकळी) व इतर अनोळखी तिघांनी कारमधून अपहरण केले.
ओंकार, दिनकर गायकवाड आणि नातेवाईक अनिकेत साळवे हे चौफुलीवर बसले असताना पप्पू वैहाने तू पैसे का देत नाहीस? असे म्हणत जबरदस्तीने ऑकारला कारमध्ये बसवले.
ओंकार आणि पप्पू वैद्य यांचा ट्रॅक्टरचा व्यवसाय होता. पप्पूने यापूर्वी ओंकारकडून ५२ हजार रुपये घेतले होते आणि पुन्हा पैशाची मागणी करत होता, अशी फिर्याद ऑकारचे वडील बन्सीधर गायकवाड यांनी परभणी ग्रामीण ठाण्यात दिली.