Parabhani: ईव्हीएम स्ट्राँगरूमसमोर राष्ट्रवादीचे सीसीटीव्ही कॅमेरे; राजकीय वातावरण तापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:56 IST2025-12-08T13:52:41+5:302025-12-08T13:56:07+5:30
नगरपरिषद निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असताना स्ट्राँगरूम परिसरातील हालचालींनी राजकीय तापमान चांगलेच वाढवले आहे.

Parabhani: ईव्हीएम स्ट्राँगरूमसमोर राष्ट्रवादीचे सीसीटीव्ही कॅमेरे; राजकीय वातावरण तापले
गंगाखेड : राष्ट्रवादी काँग्रेसने स्ट्राँगरूमसमोर स्वतःच्या खर्चातून अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवून राजकीय वातावरण तापले आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, निकालात छेडछाड झाल्याची शंका निर्माण होऊ नये, या हेतूने पक्षाने हा निर्णय घेतला असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.
नगरपरिषद निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार असताना स्ट्राँगरूम परिसरातील हालचालींनी राजकीय तापमान चांगलेच वाढवले आहे. मतदानानंतर ईव्हीएम मशीन स्ट्राँगरूममध्ये कडक बंदोबस्तात सीलबंद ठेवण्यात आल्या असल्या तरी निकाल लांबणीवर गेल्यामुळे उमेदवारांच्या मनातील धाकधूक शिगेला पोहोचली आहे. सध्याचाच बंदोबस्त अत्यंत कडक असतानाच राष्ट्रवादीने केलेली ही नवीन सुरक्षा यंत्रणा प्रशासनावरील अविश्वासाचा सूचक बिंदू मानली जात असून, अन्य पक्षांमध्येही यावरून चर्चा सुरू आहे. स्ट्राँगरूमला शस्त्रबंद पोलिस तैनात आहेतच; पण आता अतिरिक्त सीसीटीव्हीमुळे संपूर्ण परिसर २४ तास अधिक काटेकोर देखरेखीखाली येणार आहे. दरम्यान, निकालाच्या प्रतीक्षेने उमेदवारांनी झोप हरपलेली असताना स्ट्राँगरूमसमोरचा हा राजकीय ‘सतर्कतेचा’ ठसा वातावरण अधिकच तापवत आहे. २१ डिसेंबर रोजी निकालाचा पडदा उघडल्यावर या तीव्र राजकीय हालचालींना कोणती कलाटणी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिंतुरात स्ट्राँगरूमसमोर राष्ट्रवादीची सतर्कता; पदाधिकाऱ्यांची ड्युटी सुरू
जिंतूर नगरपालिका निवडणुकीचे मतदान पार पडले असून, उमेदवारांसह मतदार आता निकालाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र, जिंतूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली आहे. प्रशासनाने मतदानानंतर ईव्हीएम स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवली असून, पूर्ण बंदोबस्त राखण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्ट्राँगरूमसमोर स्वतःच्या खर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तसेच काही पदाधिकाऱ्यांची ड्युटी लावून अतिरिक्त पाहणी सुरू केली आहे. या सर्व हालचालींमुळे जिंतूरमधील राजकीय वातावरण आतापासूनच तापलेले आहे. स्ट्राँगरूमवरील या अतिरिक्त सुरक्षा उपायांनी मतदार आणि पक्षीयांकडून सतर्क नजर ठेवली जात असल्यामुळे निकालाच्या दिवशी कोणते परिणाम दिसतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
कोट
स्वखर्चाने बसविले कॅमेरे
निकाल लांबला असला तरी स्ट्राँगरूममध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे स्वतःच्या खर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा वाढवली आहे.
- डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी आमदार