परभणीत वृद्धेचा खून करून दागिने पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 19:11 IST2019-01-29T19:11:22+5:302019-01-29T19:11:49+5:30
शहरातील गुलजार कॉलनी भागात बिल्कीस बेगम (७६) या घरी एकट्याच राहत होत्या.

परभणीत वृद्धेचा खून करून दागिने पळवले
परभणी- शहरातील धाररोड भागातील गुलजार कॉलनीत एका वृद्धेचा खून झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. खून करुन ५५ हजारांचे दागिणे पळविल्याची तक्रार मयत महिलेच्या मुलाने दिली असून त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील गुलजार कॉलनी भागात बिल्कीस बेगम (७६) या घरी एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घरी काम करणारी महिला सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घरी आली तेव्हा आतून दार उघडले जात नव्हते व कुठलाही आवाज येत नसल्याने त्यांनी ही माहिती महिलेच्या मुलास दिली. त्यानंतर बराचवेळ आवाज देऊन प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडून आतमध्ये पाहिले असता बिल्कीस बेगम या मृत्यूमुखी पडल्याचे दिसून आले.
या प्रकरणी त्यांचा मुलगा मोगल समिउल्ला मिर्झा मोईनउल्ला बेग यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. चोरीच्या उद्देशाने बिल्कीस बेगम यांचा खून करुन त्यांच्या गळ्यातील ५५ हजार रुपयांचे दागिणे पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेत.