'बायको भावपूर्ण श्रद्धांजली' स्टेटस ठेवलं; माहेरी गेलेल्या पत्नीचा पाठलाग करून पतीने केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:03 IST2025-08-30T16:01:58+5:302025-08-30T16:03:36+5:30
जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील घटना

'बायको भावपूर्ण श्रद्धांजली' स्टेटस ठेवलं; माहेरी गेलेल्या पत्नीचा पाठलाग करून पतीने केला खून
जिंतूर (जि.परभणी) : किरकोळ कारणावरून बायको माहेरी गेल्याने राग आलेल्या पतीने दोन दिवसांपूर्वी बायको भावपूर्ण श्रद्धांजली, असे व्हाॅट्सॲप स्टेटस ठेवले. त्यानंतर दोन दिवसांपासून पाठलाग करून माहेरी गेलेल्या पत्नीचा संधी साधत चाकूने भोसकून खून केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथे गुरुवारी घडली.
तालुक्यातील सोनापूर तांडा येथील विद्या डिगांबर जाधव हिचे लग्न अंदाजे नऊ वर्षांपूर्वी वाघी येथील विजय रामा राठोड याच्यासोबत झाले होते. या दोघांना दोन मुले आहे. आठ दिवसांपूर्वी या दोघांत घरगुती वाद झाल्याने तिचा भाऊ राहुल जाधव याने विद्या राठोड हिला काही दिवसांसाठी माहेरी आणले. हा राग मनात धरून संबंधिताने खून करण्यापूर्वी व्हाॅट्सॲपवर स्टेटस ठेवले. बायको भावपूर्ण श्रद्धांजली, असे त्यावर लिहिले होते.
पाठलाग करून केला हल्ला
दरम्यान, विद्या राठोड हिचा चुलता विठ्ठल प्रताप जाधव याचा पाय मोडल्याने त्यांना पाहण्यासाठी विद्या राठोड या गावाशेजारील शेत आखाड्यावर जाते, म्हणून गुरुवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी घराबाहेर पडली. यावेळी तिच्या पाळतीवर असलेला तिचा पती विजय रामा राठोड याने हेरून तीक्ष्ण हत्याराने तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी वार करत तिचा खून केला व तिचा मृतदेह शेतातच ठेवून तो पळून गेला.
शेतात आढळला मृतदेह
विद्या राठोड या बराच वेळ झाला तरी परतल्या नाही, म्हणून कुटुंबीय काळजीत असतानाच त्यांना विद्या राठोड या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असल्याची माहिती मिळाली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता विद्या राठोड निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.