Jalana: १५ दिवसांपासून अन्नाविना तडफड, पाण्यात अडकलेल्या वानरांची यशस्वी सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 14:08 IST2025-08-21T14:06:35+5:302025-08-21T14:08:46+5:30
वनविभाग, मच्छीमार आणि नागरिकांच्या प्रयत्नांना यश; १५ दिवसांपासून पाण्यात अडकलेल्या वानरांची सुखरूप सुटका

Jalana: १५ दिवसांपासून अन्नाविना तडफड, पाण्यात अडकलेल्या वानरांची यशस्वी सुटका
परतूर : नैसर्गिक संकटात सापडलेल्या प्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी मानवी संवेदनांचा हात पुढे आला की, हृदयाला स्पर्शून जाणारे दृश्य घडते. असेच एक भावनिक दृश्य परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात पाहायला मिळाले. जवळपास पंधरा दिवसांपासून जलाशयातील झाडावर अडकून पडलेल्या वानरांची वनविभाग, मच्छीमार व ग्रामस्थांच्या मदतीने बुधवारी अखेर सुखरूप सुटका करण्यात आली.
निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयात गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पाण्याची पातळी झपाट्याने वाढली होती. या वाढीमुळे परतूर तालुक्यातील वैजोडा वस्ती परिसरातील एका झाडावर वानरांचा एक गट अडकून पडला. जवळपास १५ वानरे झाडावरून खाली येऊ शकत नव्हती. पाण्याने चारही बाजूंनी घेरल्याने ती झाडावरच कैद झाली होती. अडकल्यामुळे वानरे पूर्णपणे अन्नावाचून होती. भूक आणि तहानेने त्रस्त झालेली ही प्राणी सतत झाडावर हालचाल करत होती. गावकऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर ग्रामस्थ अंगद लहीरे यांनी वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर तातडीने सुटका मोहिम आखण्यात आली. झाडावरून सुटका होताच वानरांनी अक्षरशः आनंदाने उड्या मारल्या. त्यांच्या चेहऱ्यावरून सुटकेचा दिलासा स्पष्ट दिसत होता. ग्रामस्थांनीही या प्रसंगाचे समाधान व कृतज्ञतेने स्वागत केले. वनविभागाने दाखविलेली तत्परता आणि ग्रामस्थांचा सहभाग यामुळे या प्राण्यांचे प्राण वाचले.
बुधवारी वनविभागाच्या पथकाने बोट आणि दोरच्या सहाय्याने मोहीम राबवली. पाण्यात उतरून झाडावर अडकलेल्या वानरांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. मोहिमेत जालना येथील सहाय्यक वनसंरक्षक एस. एन. मुंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. दौंड यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले.
ग्रामस्थांची मदत
गावातील नागरिक, मच्छीमार व वनमजुरांनी या बचाव कार्यात मदत केली. वनपरिमंडळ अधिकारी एस. एन. पठाण, वनरक्षक के. बी. वाकोदकर, एम. एम. डब्ल्यु. सय्यद तसेच वनमजूर आत्माराम राठोड, दत्ता जाधव, भास्कर जाधव, उद्धव मांडगे यांच्यासह निवृत्ती लिंबूरे यांनी मोहिम यशस्वी केली. झाडावरून सुटका होताच वानरांनी अक्षरशः आनंदाने उड्या मारल्या.