Parabhani: रेनाखळीत ट्रॅप कॅमेऱ्यात आढळला बिबट्या; शेतकरी, उसतोड मजुरांत दहशत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:16 IST2025-12-08T13:13:56+5:302025-12-08T13:16:31+5:30
पाथरी तालुक्यात १३ हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र; बिबट्यास लपण्यासाठी अनेक जागा, सावधगिरी बाळगण्याचे वन विभागाचे आवाहन

Parabhani: रेनाखळीत ट्रॅप कॅमेऱ्यात आढळला बिबट्या; शेतकरी, उसतोड मजुरांत दहशत!
- विठ्ठल भिसे
पाथरी (जि. परभणी) : तालुक्यातील रेनाखळी शिवारात बिबट्याचे ठसे आढळून आल्यानंतर आणि दोन गायींचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या आढळून आला आहे. गुरुवारी लावलेल्या कॅमेऱ्याची चिप तपासली असता रविवारी एका शेतात बिबट्या दिसल्याचे समोर आले. दरम्यान, रेनाखळी परिसरात तालुक्यातील सर्वाधिक ४२० हेक्टर ऊस क्षेत्र एकट्या रेनाखळी शिवारात आहे. दाट उसात लपण्यासाठी सहज जागा उपलब्ध होत असल्याने या भागात बिबट्याचा वावर सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी आणि ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाथरी तालुक्यातील रेनाखळी शिवारात मागच्या आठवड्यात २७ आणि ३० नोव्हेंबरला बिबट्याच्या हल्ल्यात रेनाखळी येथील संदीपान अंबादास श्रावणे आणि प्रमोद भास्करराव हरकळ यांच्या शेतातील आखाड्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोन जनावरांचा फडशा पडला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वनरक्षक अंकुश जाधव आणि पथकाने वन घटनास्थळी पंचनामा केला होता. त्यावेळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले होते. गुरुवारी वन विभागाने तीन ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविलेले होते. शनिवारी वन विभागाने ट्रॅप कॅमेऱ्यामधील चिप तपासणीसाठी काढली. रविवारी यातील प्रमोद हरकळ यांच्या शेतातील ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्या आढळून आल्याची माहिती वन रक्षक अंकुश जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली. हा बिबट्या रेनखळीसोबतच वरखेड आणि लगतच्या सेलू भागातील काही गावांत आढळून आला आहे.
पाथरी तालुक्यातील रेनाखळी वरखेड परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचे ठसे आढळणे, दोन जनावरे फस्त करणे आणि ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याचे स्पष्ट चित्र दिसणे या घटनांमुळे शेतकरी व मजूर वर्गात भीती वातावरण निर्माण झाले आहे. सततच्या दर्शनामुळे वन विभाग सतर्क मोडवर आला असून नागरिकांना अलर्ट राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या पाथरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र असून सुमारे 13 हजार हेक्टरवर ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. या भागातील फडात बिबट्याचा मुक्त वावर असल्याने ऊस तोडणीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. स्थानिक दोन्ही साखर कारखान्यांसोबत बाहेरील जिल्ह्यांतील कारखान्यांचेही तोडणी पथक येथे दाखल झाले आहे, मात्र मजूर गटाने रात्रीचे काम टाळणे असा निर्णय घेत असल्याचे समजते. या परिस्थितीत वन विभागाने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, शेतकऱ्यांनी रात्री एकटे शेतात न जाणे, पाळीव जनावरे सुरक्षित ठेवणे याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
वन विभागाचे आवाहन
• बिबट्या परिसरात असल्याने सावध राहा
• रात्री एकटे शेतात जाऊ नका
• जनावरे मोकाट सोडू नका / सुरक्षित बांधावीत
• संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवा
बिबट्या आला तर काय करावे / काय करू नये करावे :
• बिबट्या दिसला तर घाबरू नका शांत राहा, पळून जाऊ नका
• जोरात आवाज करा / टोचणारे साधन वापरा
• गटाने राहा, टॉर्च चा वापर करा हातात घुंगराची काठी ठेवा , गळ्या भोवती रुमाल बांधा ,मोबाईल मध्ये गाणे वाजवीत जा त्याच बरोबर पशुधन जालीबंध गोठ्यात ठेवा ,शेतात व घराबाहेर झोपू नका
• गावाजवळ शेतात किंवा ऊस तोडणी दरम्यान मादी बिबट्या व पिल्ले आढळल्यास त्यास हाताळू नये