Parabhani: रेणाखळी-वरखेड शिवारात बिबट्याचा वावर कायम; दोन जनावरांचा फडशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:50 IST2025-12-02T11:50:45+5:302025-12-02T11:50:59+5:30
वन विभागाकडून ट्रॅप कॅमेरे लावण्याचे नियोजन

Parabhani: रेणाखळी-वरखेड शिवारात बिबट्याचा वावर कायम; दोन जनावरांचा फडशा
- विठ्ठल भिसे
पाथरी : तालुक्यातील रेणाखळी शिवारात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची घटना समोर आल्यानंतर, दोन जनावरांचा फडशा पडल्याने नागरिकांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. रेनाखळी सोबत बिबट्या आता वरखेड शिवारात दिसून आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.
घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून, पाऊलखुणांच्या आधारे हा बिबट्याच असल्याचा दुजारा दिला आहे. वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने ट्रॅप कॅमेरे बसवण्याचे नियोजन केले असून, बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्याच्या दिशेनेही विभागाने तयारी सुरू केली आहे.
या घटनेमुळे रेणाखळी तसेच वरखेड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी रात्री बाहेर जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित स्थळी बांधावीत व शेतशिवारात उजेडाची सोय करावी असा सल्ला वन विभागाकडून देण्यात आला आहे. ग्रामीणांमध्ये या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त होत असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला पकडावे अशी मागणी होत आहे. दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये रेनाखळी येथील संदिपान अंबादास श्रावणे आणि प्रमोद भास्करराव हरकळ मध्ये आखाडा वरील शेत गट नंबर ३१४/३६५मधील जनावरे ठार झाली आहेत
रेनाखळी येथे 27 नोव्हेंबर रोजी एका जनावरावर हल्ला झाल्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी एच एन जाधवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अंकुश जाधव यांनीजाय मुक्यावर जाऊन घटनास्थळी ची पाहणी करून पंचनामा नोंदवला सोबत वन मजूर जनार्दन राठोड पांडू वाघ हे होते त्या नंतर 30 नोव्हेंबर रोजी रेनाखळी येथे दुसऱया जनावरावर हल्ला केला , दोन्ही जनावरे हल्ल्यात दगावली आहेत तातडीने पायाचे ठसे तपासण्या आल्या नंतर बिबटयाचा हल्ला असल्याचे वन विभागाने दुजोरा दिला आहे, आता वन विभाग कडून ट्रॅप कॅमेरा लावण्यात येणार आहेत त्या नंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती वनरक्षक अंकुश जाधव यांनी दिली.