Parabhani: अवघ्या २६ वर्षांच्या डॉक्टराचा बसमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 18:51 IST2025-09-10T18:49:29+5:302025-09-10T18:51:46+5:30
बस थांबली तरी वैद्यकीय अधिकारी उतरलेच नाहीत, बस पुढच्या गावाला जाताना प्रकार झाला उघड

Parabhani: अवघ्या २६ वर्षांच्या डॉक्टराचा बसमध्येच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
जिंतूर (जि. परभणी) : वझर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जिंतूरला येण्यासाठी बसमध्ये बसले खरे. मात्र, रस्त्यातच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही बस जिंतूरला आल्यानंतर सर्व प्रवासी उतरले व बस पुढे गडदगव्हाण गावाकडे निघाली. जेव्हा वाहक तिकिटासाठी जवळ गेले असता वैद्यकीय अधिकारी त्यांना प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ जवळच्या ग्रामीण दवाखान्यात तपासणी केली व तेथून बस जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आणली असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांना मृत घोषित करण्यात आले.
तालुक्यातील वझर प्राथमिक आरोग्य केंद्रात नांदेड येथील असित योगिराज वानखेडे (वय २६) हे २५ ऑगस्टला रुजू झाले होते. सोमवारी दुपारी चार वाजता ते ड्युटी संपवून वझर येथून नांदेडकडे जाण्यासाठी त्यांचा सहकारी भगवान कांबळे यांच्यासोबत जिंतूर आगाराच्या बस (एमएच २० डीएल २१६३) मध्ये जिंतूर बसस्थानकावर आले. सायंकाळी ६ वाजता बस पोहचल्यानंतर कांबळे यांना बोरीला तर वानखेडे यांना नांदेडला जायचे होते म्हणून कांबळे यांनी डॉ.वानखेडे यांना परभणीला जाणाऱ्या बसमध्ये जाण्यास सांगितले. त्यावर डॉ. वानखेडे यांनी बसला गर्दी आहे, तुम्ही पुढे जा, मी दुसऱ्या बसने येतो, असे सांगितले. त्यानंतर वझर येथून जिंतूरला आलेली बस (एमएच २० डीएल २१६३) ही गडदगव्हाणला जाण्यासाठी निघाली. वाहक शंकर भाग्यवंत हे प्रवाशांचे तिकीट काढत असताना त्यांनी डॉ. वानखेडे यांना तिकीट घेण्यासाठी दोन-तीन वेळेस आवाज दिला. परंतु, वानखेडे उठत नसल्याने त्यांनी शेजारील प्रवाशाला त्यांना उठवण्यासाठी सांगितले. परंतु, ते जागे होत नसल्याने त्यांना हलवले असता ते बसमधील सीटवरून खाली पडले. प्रसंगावधान राखत वाहक, चालकाने बस पाचेगावच्या खासगी रुग्णालयात नेऊन डॉ.असित यांना तपासले असता ते मृत झाल्याचे लक्षात आले. याबाबत आगार प्रमुखांशी चर्चा करून बस परत शहरात ग्रामीण रुग्णालयात आणली. तेथे डॉ.असित वानखेडे यांना तपासले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला असावा, असे सांगितले.
हृदयविकाराचा झटका जिंतूरलाच आला असावा
जिंतूरला बस थांबली असतानाच जिंतूरला अनेक प्रवासी उतरले, त्यांचा सहकारीपण उतरला. मात्र, हे मागे बसून राहिले. त्याच कालावधीत त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा व जिंतूरला बसस्थानकावर उतरण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा कयास बांधण्यात येत आहे.