Parabhani: माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची पाथरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यास मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 18:55 IST2025-03-17T18:54:26+5:302025-03-17T18:55:42+5:30
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची आठवड्यातील दुसरी घटना आहे.

Parabhani: माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची पाथरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यास मारहाण
- विठ्ठल भिसे
पाथरी : पाथरी नगरपरिषद अंतर्गत साईबाबा विकास आराखडा समितीमध्ये काम करणाऱ्या नगरपरिषदेच्या एका कर्मचाऱ्यास माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयातच बेदम मारहाण केल्याची घटना 17 मार्च रोजी सकाळी 11 च्या सुमारास घडली. दरम्यान, याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात माजी आमदार दुर्राणी यांच्या सहा ते आठ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा केला आणि इतर कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्राणी यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल होण्याची आठवड्यातील दुसरी घटना आहे.
पाथरी येथील साईबाबा विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मधुकर दिवाण काम पाहतात. त्यांच्याकडे मागील आठ महिन्यापासून सदाशिव अण्णासाहेब गायकवाड हे सहायक म्हणून काम करतात. 17 मार्च रोजी सकाळी 11 वाजता सदाशिव गायकवाड हे नगरपरिषदमधील कार्यालयात शासकीय काम करत असताना माजी बाबाजानी दुर्राणी आणि इतर आठ जण दाखल झाले. यावेळी दुर्राणी म्हणाले की, ''सदाशिव गायकवाड तू कायको काम कर रहा है? दिवाण कहा है? इसको बहुत ज्यादा हो गया इसको मारो.'' असे म्हणत दुर्राणी यांनी सदाशिव गायकवाड यास तेथे असलेल्या लाकडी फळीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच इतर कार्यकर्त्यांनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, दुर्राणी हे मुख्याधिकारी यांच्या खुर्चीवर जाऊन बसले, त्यानंतर गायकवाड यांच्या कडील वसुलीची रक्कम 5 हजार 200 आणि 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून घेतला, अशी फिर्याद गायकवाड यांनी दिली आहे.
यावरून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी ,शेहजाद बखतीयार खान, शेख इरफान शेख रजाक,रेहान मगबूल खान दुरराणी , हमीद खान शेर खान, शेख नासिर शेख रौफ, अब्दुल इब्राहिम अब्दुल रशीद अन्सारी, शेख अल्ताफ शेख मुल्लाक, यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणि विविध कलमा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
माजी लोकप्रतिनिधीची गुंडागिरी
पाथरी नगरपरिषदेवर सध्या प्रशासक आहे नगरपरिषदचा कारभार प्रशासकमार्फत चालतो. मात्र एका माजी लोकप्रतिनिधींनी नगरपरिषद कार्यालयात येत कर्मचाऱ्यांना मारहाण करणे तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसणे ही बाब लोकशाहीला शोभा देणारी नाही. माजी लोकप्रतिनिधी गुंडगिरी करत आहेत याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे.
- तुकाराम कदम, मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी
नगरपरिषदेतील गाढवाची चर्चा
नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांना मारहाण घटना घडण्यापूर्वी नगरपरिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये काही गाढव आणण्यात आली होती. हे गाढव नेमकं कशासाठी आणली होती याचा उलगडा झाला नाही. मात्र, यावरून अधिकाऱ्यांची दिंड काढली जाणार असल्याची चर्चा परिसरात होती.