Parabhani: हॉटेलचालकाने मागितले चहा-सिगारेटचे पैसे, त्यांनी केला खून, तीन आरोपी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 13:55 IST2025-04-30T13:52:46+5:302025-04-30T13:55:08+5:30

चहा, सिगारेट न दिल्याच्या रागातून हॉटेलचालकाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी केली अटक

Parabhani: Complaints to the police were fruitless; Hotel owner demanded money for tea and cigarettes, they killed him | Parabhani: हॉटेलचालकाने मागितले चहा-सिगारेटचे पैसे, त्यांनी केला खून, तीन आरोपी ताब्यात

Parabhani: हॉटेलचालकाने मागितले चहा-सिगारेटचे पैसे, त्यांनी केला खून, तीन आरोपी ताब्यात

गंगाखेड (जि.परभणी) : शहरातील बसस्थानकाशेजारी असलेल्या बाबा सैलानी हॉटेल व पानपट्टीधारक मारोती (शिवा) तुकाराम साळवे (४५, रा.आंबेडकर नगर) यांचा चहा, सिगारेट न दिल्याच्या कारणावरून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी ८:३० वाजता घडली. आरोपींना तत्काळ ताब्यात घ्या अन्यथा मृतदेह उचलणार नाही, या मागणीसाठी साळवे यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी सायंकाळपर्यंत पोलीस ठाणे व उपजिल्हा रुग्णालयात ठाण मांडले होते.

मयताचा मुलगा अरविंद साळवे याने गंगाखेड ठाण्यात तक्रार दिली. आवेज खान गफार खान पठाण (रा.नेहरू चौक), जुनेद जरावार खान (रा. वजीर कॉलनी) व किशोर मंचक भालेराव (रा. नवा मोंढा) हे नेहमी मारोती साळवे यांच्या हॉटेलवर येऊन चहा व सिगारेट घ्यायचे व पैसे देत नव्हते. माझ्या वडिलांनी त्यांना पैसे मागितले असता वडिलांसोबत ते भांडण करायचे.

मंगळवारी सकाळी ८ वाजता मारोती साळवे व फिर्यादी हॉटेलवर असताना किशोर मंचक भालेराव याच्या सांगण्यावरून आवेज गफार खान पठाण व जुनेद जरावर खान हे दोघे कार क्रमांक (एमएच ०९ डिए-२८५०) ने हॉटेलवर आले. त्या दोघांनी चहा व सिगारेट मागितली असता मारोती साळवे यांनी देण्यास नकार दिला. हा राग मनात धरून आवेज खान व जुनेद खान या दोन आरोपींनी मृतास शिवीगाळ करून पळून गेले. सततच्या शिवीगाळीला व दहशतीचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व मारोती साळवे हे दोघे त्यांचा पाठलाग करत गोदावरी नदीघाटावर गेले. तुम्ही मला नेहमी त्रास देत आहात, अशी विचारणा करताच आवेज खान व जुनेद या दोघांनी मारोती साळवे यास छातीमध्ये, पोटावर, अन्य ठिकाणी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने मारोती साळवे जमिनीवर कोसळले व मारहाणीतून त्यांचा मृत्यू झाला, असे म्हटले आहे.

अरविंद साळवे यांच्या फिर्यादीवरून आवेज खान गफारखान पठाण, जुनेद खान जरावार पठाण व किशोर मंचक भालेराव या तिघांविरुद्ध गंगाखेड ठाण्यात भा.न्या.सं.२०२३ अन्वये १०३(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १८८९ अन्वये गुन्हा नोंद झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, प्रशिक्षणार्थी सहा.पोलिस अधीक्षक हृषिकेश शिंदे, उपनिरीक्षक विशाल बोधोडकर, आसद शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीस पकडून खुनासाठी वापरलेली कार जप्त केली. सायंकाळी साडेसहा वाजता मृत मारोती साळवे यांच्या पार्थिवावर गोदाकाठी अंत्यसंस्कार झाले. यावेळी जनसमुदाय उपस्थित होता. मृत मारोती साळवे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

आवेज खानवर अनेक गुन्ह्यांची नोंद
खूनप्रकरणातील मुख्य आरोपी आवेज खान गफार खान पठाण याच्यावर गंगाखेड ठाण्यात यापूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी आवेज खान यास शिताफीने अटक करून शहराच्या मुख्य मार्गावरून त्याची अक्षरशः धिंड काढली.

यापूर्वी मृताच्या चार-पाच फिर्याद
चार ते पाच महिन्यांपासून आरोपी आवेज खान व इतर आरोपीविरुद्ध मृत मारोती साळवे यांनी होत असलेल्या त्रासाबद्दल चार ते पाच फिर्यादी नोंदविल्याची माहिती मृताच्या कुटुंबीयांनी दिली. मात्र, पोलिसांकडून ठोस भूमिका न झाल्याने अखेर आरोपीकडून मारुती साळवे यांचा खून होण्यापर्यंतची मजल पोहोचली. यापूर्वीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोलिसांकडून ठोस कारवाई झाली असती तर मारोती यांना जीव गमवावा लागला नसता, अशी भावना कुटुंबीयांनी बोलून दाखवली.

Web Title: Parabhani: Complaints to the police were fruitless; Hotel owner demanded money for tea and cigarettes, they killed him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.