Parabhani: पाथरीत तयारी करूनही एबी फॉर्म न दिल्याने भाजपत उद्रेक; वाद श्रेष्ठींच्या कोर्टात
By विजय पाटील | Updated: November 26, 2025 16:00 IST2025-11-26T15:59:55+5:302025-11-26T16:00:02+5:30
या प्रकरणात आता श्रेष्ठी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले असून, भाजपमधील अंतर्गत वादातून या प्रकरणारा हवा देणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

Parabhani: पाथरीत तयारी करूनही एबी फॉर्म न दिल्याने भाजपत उद्रेक; वाद श्रेष्ठींच्या कोर्टात
परभणी : जिल्ह्यात पाथरीत भाजपने सर्व तयारी करून उमेदवारांना एबी फॉर्म न दिल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निरीक्षक म्हणून गेलेल्या प्रमोद वाकोडकर यांनी संघटन मंत्र्यांमार्फत पक्षाध्यक्षांकडे हा अहवाल पाठविल्याचे सांगितले जात आहे.
पाथरी येथील कार्यकर्त्यांनी २० नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकारास जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे हे जबाबदार असल्याचा आरोप केला. तर, यात चौकशीची मागणी केली होती. विशेष म्हणजे तोपर्यंत तेथे निरीक्षक वाकोडकरही पोहोचले होते. निरीक्षकांनी संबंधितांचे म्हणने ऐकून त्याचा अहवालही तयार करून पाठविला आहे. आधी निरीक्षक म्हणून वाकोडकर यांना नेमलेच कुणी? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, संघटनमंत्री संजय कौडगे यांनी त्यांना तेथे पाठविल्याचे वाकोडकर यांचे म्हणणे आहे. तर, जिल्हाध्यक्ष भुमरे यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर व वरिष्ठ नेत्यांशी बोलूनच पाथरीत भाजपने न लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. मग पाथरीत लढण्याची तयारी करणाऱ्यांनाच हे माहिती का नाही?, हाही प्रश्न होता. या प्रकरणात आता श्रेष्ठी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले असून, भाजपमधील अंतर्गत वादातून या प्रकरणारा हवा देणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
पूर्णेत व मानवतलाही बॅकफूट
पूर्णेतही भाजपची मंडळी स्वबळ आजमावण्याची तयारी करीत होते. शिवाय मानवतलाही अनेकांची इच्छा होती. मात्र, पक्षाने शिंदेसेनेसोबत जाऊन कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. भाजपच्या नेत्यांतील अंतर्गत कलहाची किनार असून, शह-काटशहाचे राजकारण कार्यकर्त्यांना नडले.
वरपूडकरांची तर कोंडी नाही?
या सगळ्या भानगडीत पाथरी विधानसभेचे आमदार राहिलेल्या व सध्या भाजपत असलेल्या माजी आ. सुरेश वरपूडकर यांना कोंडीत पकडण्याचा तर प्रयत्न नाही? असाही प्रश्न आहे. वरपूडकरांना जुन्या व नव्यांचा संगम करून पाथरी, सोनपेठ व मानवतमध्ये नवी ताकद निर्माण करण्याचा योग जुळून आला होता. शिवाय तेच या भागाचे प्रभारी आहेत. मात्र, त्यांचे अस्तित्वच जाणवत नसल्याने त्यांनाच कोंडीत धरण्याचा तर प्रकार नाही ना? अशीही चर्चा भाजपीयांतच रंगली आहे.