Parabhani: शेतातून परतणाऱ्या मजुरांना दुचाकीची धडक, एका महिलेसह दुचाकीस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 13:55 IST2025-10-09T13:54:10+5:302025-10-09T13:55:10+5:30
पूर्णा-सिंगणापूर मार्गावरील घटना; याप्रकरणी शेख मुक्रम यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

Parabhani: शेतातून परतणाऱ्या मजुरांना दुचाकीची धडक, एका महिलेसह दुचाकीस्वार ठार
ताडकळस (परभणी) : सोयाबीनची कापणी करून घरी परतणाऱ्या महिला मजुरांना दुचाकीने धडक दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पूर्णा-सिंगणापूर मार्गावर घडली. या अपघातात दुचाकीस्वारासह एक महिला मजूर ठार झाली तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या. शेख शमीनाबी शेख नूर (रा. ताडकळस, ता. पूर्णा) असे मयत महिलेचे नाव आहे.
शेख मुक्रम शेख शरफोद्दीन यांनी ताडकळस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी सायंकाळी सोयाबीनची कापणी करून शेख मुमताज शेख अजमोद्दीन, शेख समीना शेख हमीद व शेख शमीनाबी शेख नूर ह्या तिघी घराकडे परत येत होत्या. दरम्यान, पूर्णा-सिंगणापूर मार्गावरील एका गॅस एजन्सीजवळ येताच पाठीमागून येणाऱ्या दुचाकी क्रमांक (एमएच २२ बीजी १४३९)च्या स्वाराने तिघींना जोरदार धडक दिली. यात शेख मुमताज, शेख समीना, शेख शमीनाबी ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ परभणी येथील रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादम्यान शेख शमीनाबी शेख नूर यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार गौतम लिंबाजी मस्के हे ठार झाले. याप्रकरणी शेख मुक्रम यांच्या फिर्यादीवरून ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.