एकतर्फी प्रेमातून शेजाऱ्यानेच तरुणीस भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 19:30 IST2020-06-27T19:29:29+5:302020-06-27T19:30:37+5:30
शरीरावर तसेच पोटावर वार केले व जखमी अवस्थेत सदरील मुलीला सोडून आरोपी निघून गेला.

एकतर्फी प्रेमातून शेजाऱ्यानेच तरुणीस भोसकले
परभणी : तालुक्यातील तरोडा येथे एका १९ वर्षीय तरुणीस एकतर्फी प्रेमातून चाकूने भोसकल्याची घटना बुधवारी घडली असून याप्रकरणी लक्ष्मण एकनाथ खवले याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, २४ जून रोजी आपली १९ वर्षीय मुलगी शौचास गेली असता घराशेजारील लक्ष्मण एकनाथ खवले याने एकतर्फी प्रेमातून काही न बोलता चाकूने तिच्या शरीरावर तसेच पोटावर वार केले व जखमी अवस्थेत सदरील मुलीला सोडून आरोपी निघून गेला.
त्यानंतर जखमी मुलीने घर गाठले. त्यानंतर उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले. नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करावी, असेही या संदर्भातील फिर्यादीत पीडितेच्या वडिलांनी म्हटले आहे. त्यावरुन परभणी ग्रामीण ठाण्यात आरोपी लक्ष्मण खवले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.