कुख्यात अमोल देशमुख परभणी जिल्ह्यातून हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 19:12 IST2021-06-23T19:12:29+5:302021-06-23T19:12:53+5:30
उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी अमोल भारत देशमुख यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.

कुख्यात अमोल देशमुख परभणी जिल्ह्यातून हद्दपार
परभणी : तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील अमोल भारतराव देशमुख याच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी काढले असून, त्यास ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्याबाहेर नेऊन सोडले आहे.
अमोल देशमुख याच्याविरुद्ध मुलींवर बलात्कार करणे, मालमत्ता जबरीने घेण्यासाठी दुखापत करणे, लोकसेवकाला इच्छापूर्वक दुखापत करणे, सार्वजनिक उपद्रव करणे, प्राणघातक शस्त्रांसह दंगा करणे आदी विविध गुन्हे २०१६ पासून ते २०२० पर्यंत दाखल आहेत. २०१९ मध्ये त्याच्याविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाईही करण्यात आली होती. वारंवार प्रतिबंधात्मक कारवाया करून अमोल देशमुख याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अमोल देशमुख यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे हद्दपार करण्याविषयीचा प्रस्ताव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठविला होता. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांनीही प्राथमिक चौकशी करून अमोल देशमुख यास हद्दपार करण्याची शिफारस केली होती.
या प्रस्तावाची पडताळणी करून पोलीस अधीक्षकांनी हा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला. त्यावर सुनावणी होऊन उपविभागीय दंडाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी अमोल भारत देशमुख यास एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार २१ जून रोजी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी ज्ञानोबा डोळे, रामराव मगर यांनी देशमुख यास हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे नेऊन सोडले आहे.