जीवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ४०० रुपये दाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:16 IST2021-05-24T04:16:18+5:302021-05-24T04:16:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : कोरोना काळात कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिलेल्या वॉर्डबॉयना जीवावर उदार होऊन कामे करावी लागतात; परंतु ...

जीवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ४०० रुपये दाम
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोरोना काळात कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिलेल्या वॉर्डबॉयना जीवावर उदार होऊन कामे करावी लागतात; परंतु त्यांना केवळ चारशे रुपये मानधनावरच समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे असलेल्या या कर्मचाऱ्यांविषयी शासनाची उदासिनता दिसून येत आहे.
कोरोनाचे संकट निर्माण झाल्यानंतर आरोग्य विभागाची धावपळ झाली. या संकट काळात कंत्राटी कर्मचारीच मदतीला धावले. मात्र, शासनाने या कर्मचाऱ्यांना केवळ तीन महिन्यांची कंत्राटी नियुक्ती देऊन त्यानंतर आवश्यकता भासली तरच या कर्मचाऱ्यांना पुढील नियुक्ती दिली जात आहे.
कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिलेल्या या कर्मचाऱ्यांमध्ये वॉर्डबॉय पदाचाही समावेश आहे. वॉर्डबॉयना अतिशय जोखमीची कामे करावी लागतात. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाजवळ कोणी जाण्यासही धजावत नाही. मात्र, त्याच मृतदेहाला स्पर्श करून मृतदेह इतर ठिकाणी हलविणे, मृतदेहाची पॅकिंग करणे तसेच इतर कामे या वाॅर्डबाॅयना करावी लागतात. जीवावर उदार होऊन ही कामे करत असताना शासनाने मात्र वॉर्डबॉयना केवळ ४०० रुपये मानधन दिले आहे. विशेष म्हणजे, वॉर्डबॉयच्या आरोग्याविषयी कुठलीही काळजी घेतली जात नाही. त्यांना विमा रक्कम अथवा इतर सुरक्षाही दिली जात नाही. या कर्मचाऱ्यांसाठी ना राहण्याची सुविधा आहे, ना खाण्याची. तेव्हा जीवावर बेतून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी देऊन त्यांचे मानधन वाढविण्याची गरज आहे.
पोट भरेल एवढे पैसे द्या, नोकरीत कायम करा
कोरोनाच्या संकट काळात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान त्यांच्या कुटुंबाचे पोट भरले एवढा पगार शासनाने देणे अपेक्षित आहे. मागील वर्षभरापासून कायम कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या कर्मचार्यांना सेवेत कायम करावे. कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना नोकरीची शाश्वती शासनाने दिली पाहिजे. तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वाऐवजी इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर अकरा महिन्यांची नियुक्ती द्यावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
काय असते काम
कोरोना रुग्णालयांमध्ये वॉर्डबॉय म्हणून तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना अतिशय जोखमीची कामे करावी लागतात. कोरोना रुग्णाचा मृतदेह एका जागेवरून दुसर्या जागेवर हलविणे, या मृतदेहांची पॅकिंग करणे ही जोखमीची कामे वॉर्डबॉयना करावी लागतात. त्याचप्रमाणे उपचारादरम्यान कोरोना रुग्णांजवळ जावून औषधे देणे, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणे यासह इतर कामे करावी लागतात.
मृतदेहाचे पॅकिंग आणि शिफ्टिंग; कधी कामाचे मोल नाही
कोरोनासाठी कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे मोल दिले जात नाही. या कर्मचाऱ्यांमध्ये वॉर्डबॉयना जीवावर उदार होऊन कामे करावी लागतात. कोरोनाबाधित रुग्णाच्या मृतदेहाजवळही कोणी जात नाही. अशावेळी वॉर्डबॉयनाच मृतदेहांचे शिफ्टिंग करणे, पॅकिंग करणे ही कामे करावी लागतात. ही बाब लक्षात घेता, वॉर्डबॉयना किमान त्यांच्या कामाचे मोल योग्य पद्धतीने करून मानधन वाढवून देणे आवश्यक आहे.
कोरोनाचे संभाव्य संकट लक्षात घेता, कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढेही कामे द्यावी लागणार आहेत. शासनालाही या कर्मचाऱ्यांना पुढील नियुक्ती आदेश द्यावे लागणार आहेत. तेव्हा शासनाने कंत्राटी तत्त्वावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना एकप्रकारची सुरक्षितता प्रदान करणे आवश्यक आहे.
कंत्राटी तत्वावर नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुरक्षिततेसाठी कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे या कर्मचाऱ्यांचाही विमा उतरवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शासनाने पावले उचलावीत, अशी मागणी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष भंडे यांनी केली आहे.