अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2021 18:55 IST2021-12-15T18:55:04+5:302021-12-15T18:55:31+5:30
चार दिवसानंतर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तर एकजण गंभीर जखमी
पाथरी : भरधाव टेम्पोने समोरून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना 10 डिसेंबर रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास पाथरी-ढालेगाव रस्त्यावर झाली होती. या प्रकरणी चार दिवसानंतर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी येथील सैफ खान अफजल खान आणि शेख अब्दुल फैजाण अब्दुल सामी हे दोघे जण 10 डिसेंबर रोजी अहमदनगर येथून दुचाकीवरून ( क्र एम एच 16 सी पी 0709 ) परभणीकडे निघाले होते. रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला ढालेगाव ते पाथरी रस्त्यावर एका मठाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
यावेळी डॉक्टरांनी तपासून शेख अब्दुल फैजन अब्दुल समी ( 19 ) यास मृत घोषित केले. तर सैफ खान हा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी 14डिसेंबर रोजी रात्री मृताचा भाऊ अब्दुल रफी अब्दुल समी याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जी एम कराड हे करत आहेत.