मुख्यमंत्र्यांना 'एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह'; शेतकरी बापाचे दुःख पाहून मुलीचा थेट फोन, काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 14:35 IST2025-12-08T14:30:40+5:302025-12-08T14:35:01+5:30
शेतकरी कन्येने थेट मुख्यमंत्र्यांना साधला संपर्क; ४८ तासांत 'मेकॅनिकल चमत्काराने' सोलार पंप सुरू!

मुख्यमंत्र्यांना 'एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह'; शेतकरी बापाचे दुःख पाहून मुलीचा थेट फोन, काम पूर्ण
मानवत (जि. परभणी) : एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह, असा एखाद्या चित्रपटातील कथानकाला शोभेल, असा अनुभव तालुक्यातील रामपुरी येथील इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या दुर्गा केशव नाईक हिला शुक्रवारी (५ डिसेंबर) आला. शासनाच्या ‘मागेल त्याला सौर पंप’ योजनेंतर्गत जून महिन्यात मानवत तालुक्यातील केशव गंगाधर नाईक या शेतकऱ्याने शेतात कृषीपंप बसवला. तीन-चार दिवसांतच नैसर्गिक आपत्तीने सोलार पॅनल पूर्ण कोसळला. शेतकऱ्याने या घटनेची तक्रार संबंधित विभागाकडे केली. मात्र, तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अखेर या शेतकऱ्याच्या कन्येने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि पुढील ४८ तासांत शेतकऱ्याच्या शेतातील सोलार पॅनल दुरुस्त करून बसवण्यात आला.
एका महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप बसवण्यात आल्यामुळे राज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. या नोंदीचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत ५ डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित केला होता. यावेळी केशव नाईक यांची मुलगी दुर्गा हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शेतातील घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दुर्गा हिच्या फोनची तत्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणेला आदेश दिले. पुढील ४८ तासांत संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील सोलार पॅनल दुरुस्त करून देण्यात आला. यानंतर बोअर सुरू झाला. गाव परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी शेतकऱ्याच्या लेकीच्या तक्रारीची दखल घेतल्याने कुतूहल व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली
माझे वडील अनेक महिन्यांपासून सोलार पंप दुरुस्तीसाठी कंपनीकडे वारंवार तक्रार करीत होते. त्यांच्या तक्रारीची दखल कंपनी घेत नव्हती. शेवटी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनावरून मी मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमात फोन केला. त्यांनी माझी व्यथा एकूण ४८ तासांच्या आत सोलार पंप दुरुस्त केला. मुख्यमंत्र्यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या मुलीची दखल घेतल्याने समाधान आणि आनंद आहे.
- दुर्गा नाईक, शेतकरी कन्या