अशुद्ध पाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना अर्पण; विविध मागण्यांवरुन गंगाखेडमध्ये भाजपा आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 16:37 IST2021-02-20T16:37:16+5:302021-02-20T16:37:55+5:30
गंगाखेड शहराला आठ ते दहा दिवसाआड होत असलेला अशुद्ध पाणी पुरवठा बंद करून शहर वासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा.

अशुद्ध पाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना अर्पण; विविध मागण्यांवरुन गंगाखेडमध्ये भाजपा आक्रमक
गंगाखेड: गोदावरी नदी पात्रात तात्पुरता बंधारा बांधून गंगाखेड शहराला दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा या व अन्य विविध मागण्यांसाठी शनिवारी ( दि. २० ) भाजपाचा मोर्चा नगर परिषद कार्यालयावर धडकला. आक्रमक आंदोलकांनी नळाला आलेले अशुद्ध पाणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला अर्पण केले.
गंगाखेड शहराला आठ ते दहा दिवसाआड होत असलेला अशुद्ध पाणी पुरवठा बंद करून शहर वासीयांना दररोज शुद्ध पाणी पुरवठा करावा. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी गीदावरी नदी पात्रात तात्पुरता बंधारा बांधून वाहून जाणारे पाणी अडवावे. मुख्य बाजार पेठेतील पोलीस स्टेशन ते पोस्ट ऑफिस कार्यालय रस्ता दुरुस्त करावा, शहरातील नित्कृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करावी आदी विविध मागण्यांसाठी भाजपाच्या वतीने शनिवारी सकाळी ११ वाजता भगवती चौक येथून नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याऐवजी उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, पाणी पुरवठा अभियंता मयुरी पाटील व कार्यालयीन अधीक्षक शेख अफजलोद्दीन निवेदन स्विकारायला आले. यामुळे आक्रमक आंदोलकांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांना अशुद्ध पाणी अर्पण करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठलराव रबदडे, अड. व्यंकटराव तांदळे, बाबासाहेब जामगे, माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे, तालुकाध्यक्ष कृष्णा सोळंके, शहराध्यक्ष श्रीनिवास मोटे, महिला आघाडी शहराध्यक्ष रुपाली जोशी, रेखा पेकम, पदमजा कुलकर्णी, आदिनाथ मुंडे, तुकाराम आय्या, अरुण मुंडे, गोविंद रोडे, सविता राखे, बाळासाहेब गव्हाणकर, रेणुका असमार, कृष्णा कवठेकर, रामेश्वर अळनुरे, रवि जोशी, श्रीपाद कोद्रीकर, भास्कर जाधव, कमलबाई शेटे, अनिता कुलकर्णी, प्रभाकर लंगोटे आदींचा मोर्चा सहभाग होता.