माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव

By मारोती जुंबडे | Updated: June 19, 2025 17:45 IST2025-06-19T17:43:46+5:302025-06-19T17:45:27+5:30

जुन्या सागवानी लाकडावर कोरलेला दरवाजा ११ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याने सजविण्यात आला असून, त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही महाविष्णूंची आयुधे कोरली आहेत.

Offering of 11 kg silver door in the gabhara of Gyaneshwar Mauli temple at Aalandi; Service of Maslekar couple from Parbhani | माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव

माऊली मंदिराच्या गाभाऱ्यात ११ किलो चांदीचा दरवाजा अर्पण; परभणीच्या दांपत्याचा सेवाभाव

परभणीश्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात परभणी येथील वैद्यकीय दांपत्याने ११ किलो वजनाचा चांदीचा दरवाजा मुख्य गाभाऱ्यास अर्पण केला. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिराच्या गाभाऱ्यास अर्पण करण्यात आलेल्या नव्या दरवाज्यामुळे भक्तांसाठी भावनिक आणि आध्यात्मिक क्षण अनुभवता आला.

आळंदीत डॉ. मसलेकर यांनी सेवेकऱ्यांसाठी विशेष आरोग्य शिबिर आयोजित केले होते. परभणीतून विविध औषधे, तपासणी साहित्य आणून एकूण २२० सेवेकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सेवाकार्यातून मिळालेल्या अध्यात्मिक अनुभूतीतून गाभाऱ्यास काहीतरी अर्पण करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्यातून दरवाजा अर्पण करण्याचा संकल्प रुजला. जुन्या सागवानी लाकडावर कोरलेला दरवाजा ११ किलो वजनाच्या शुद्ध चांदीच्या पत्र्याने सजविण्यात आला असून, त्यावर शंख, चक्र, गदा, पद्म ही महाविष्णूंची आयुधे कोरली आहेत.

दरवाजा तयार करण्यासाठी डॉ. मसलेकर दांपत्याने स्वतः वेळ देत चार महिन्यांत हे कार्य पूर्ण केले. हा दरवाजा आळंदीच्या मंदिरात वारीच्या आदल्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने बसविण्यात आला. माऊली वारीच्या प्रस्थानपूर्व दिवशी ही अर्पणक्रिया पार पडली. मंदिर ट्रस्टचे योगी निरंजनदास महाराज आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते मसलेकर दांपत्याचा सन्मानही करण्यात आला.

सेवाभावी वृत्तीने आरोग्य शिबिर घेत असताना सेवेकऱ्यांच्या निःस्वार्थ भावनेने भारावून गेलो. गाभाऱ्यात उभा राहताना एक विलक्षण आध्यात्मिक अनुभूती मिळाली आणि त्या प्रेरणेतूनच हा दरवाजा अर्पण करण्याचा संकल्प केला.
- डॉ. श्रीराम मसलेकर

वैद्यकीय व्यवसायात असतानाही समाजासाठी काहीतरी भक्तिभावाने करावे, ही आमची सदैव इच्छा होती. हा दरवाजा म्हणजे आमच्या श्रद्धेचे आणि समाजसेवेच्या भावनेचे प्रतीक आहे.
- डॉ. पद्मजा मसलेकर

Web Title: Offering of 11 kg silver door in the gabhara of Gyaneshwar Mauli temple at Aalandi; Service of Maslekar couple from Parbhani