जिल्ह्यातील नर्सरी, केजीच्या २४ हजार बालकांचे पुढील वर्षही घरातच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST2021-05-26T04:18:34+5:302021-05-26T04:18:34+5:30
परभणी : कोरोनामुळे जिल्ह्यातील नर्सरी, केजीमध्ये जाणाऱ्या जवळपास २४ हजार बालकांचे पुढील वर्षही घरातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ...

जिल्ह्यातील नर्सरी, केजीच्या २४ हजार बालकांचे पुढील वर्षही घरातच?
परभणी : कोरोनामुळे जिल्ह्यातील नर्सरी, केजीमध्ये जाणाऱ्या जवळपास २४ हजार बालकांचे पुढील वर्षही घरातच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मुलांना अक्षरओळख ते अक्षरअट्टहास याची माहिती मिळणार कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोनामुळे देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. मधल्या काळात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. गेल्या वर्षभरापासून नर्सरी, केजीसह सर्व वर्गांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. मधल्या काळात ६ वी वर्गाच्या पुढील वर्गांच्या शाळा सुरू झाल्या होत्या; परंतु नर्सरी, केजी आणि पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले नाहीत.
लहान मुलांना अक्षरओळख, शब्दओळख, अक्षरे गिरविणे, अंक परिचय ते अंक अट्टहास, हात आणि मेंदू यांचा वापर, चित्र काढणे, रंग ओळखणे, चित्रात रंग भरणे, दिशांची माहिती कळावी, यासाठी त्यांना नर्सरीमध्ये पाठविण्यात येते. जिल्ह्यात अशा जवळपास १७५ शाळांमध्ये २४ हजार बालके शिक्षणाचे धडे गिरवितात. गेल्या वर्षभरापासून त्यांचे शिक्षण बंद आहे. शिवाय यावर्षीही कोरोनाचा संसर्ग कमी झाला नसल्याने त्यांचे हे वर्षही घरातच जाण्याची शक्यता आहे.
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम; अशी घ्या काळजी
पालकांनी मुलांना वेळेचे नियोजन करून द्यावे. मुलांच्या आवडीनुसार त्यांच्यासोबत खेळण्यासाठी वेळ द्यावा. मुलांची एनर्जी वापरली गेली नाही तर ती भावनेच्या माध्यमातून बाहेर पडते व मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो. त्यामुळे त्यांची काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. सुभाष काळे, मानसोपचार तज्ज्ञ
संस्थाचालक म्हणतात...
पूर्व प्राथमिक शिक्षणामध्ये शालेय शिक्षणाबरोबरच नीतिमूल्य, संस्कार व सर्वांगीण विकासाचे धडे मुलांना दिले जातात. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे गेल्या वर्षभरापासून विद्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होत आहे.
- प्रवीण धाडवे, संस्थाचालक
पूर्व प्राथमिक शिक्षण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण व अविभाज्य घटक असते. विद्यार्थ्याच्या मेंदूचा जवळपास ९० टक्के बौद्धिक विकास वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत होत असतो. त्यामुळे हे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.
- रामेश्वर राऊत, संस्थाचालक
अक्षर ओळख आणि अंक ओळख, डोळ्यांना आणि कानांना समजण्यासाठी, तसेच ते लिहायला शिकविण्याचा उद्देश, हातात पेन्सिल पकडण्याची ग्रीप यावी, या दृष्टिकोनातून लहान मुलांसाठी नर्सरी, केजीचे शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे; कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून या शिक्षणापासून मुलांना दूर राहावे लागत आहे. याबद्दल वाईट वाटत आहे.
- दत्ता पवार, संस्थाचालक
पालकही हैराण
मुलाला नर्सरीमध्ये टाकायचे होते; कोरोनामुळे गेल्या वर्षी ते शक्य झाले नाही. त्यामुळे यावर्षी तरी प्रवेश घ्यावा म्हटलं तर कोरोनाचे संकट टळलेले नाही. त्यामुळे नाइलाजाने मुलाला घरीच याबाबत थोडेफार शिकवीत आहे.
- संजय काळे, पालक
मुलीला केजीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे; परंतु कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नाही. त्यामुळे बाहेर कोठेही पाठविण्याची हिंमत होत नाही. मुलांच्या शिक्षणापेक्षा त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी केजीत प्रवेश घेऊ.
- निर्मलाताई पाटील, पालक
मुलांना अक्षरांची ओळख व्हावी, निसर्गाची माहिती व्हावी, यासाठी त्यांना नर्सरी, केजीमध्ये प्रवेश दिलाच पाहिजे; परंतु सध्याचे वातावरण चांगले नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेस प्राधान्य असावे.
- अशोक ढाले, पालक