बोरीतून रुग्ण रेफरचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:17 IST2021-04-24T04:17:19+5:302021-04-24T04:17:19+5:30
बोरी : रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नशिबी गैरसोयच येत आहे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्याने व कंत्राटी पद्धतीवर ...

बोरीतून रुग्ण रेफरचे प्रमाण वाढले
बोरी : रुग्णांच्या सोयीसाठी उभारलेल्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या नशिबी गैरसोयच येत आहे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्याने व कंत्राटी पद्धतीवर वैद्यकीय अधिकारी भरल्याने रुग्णांवर उपचार करण्यापेक्षा रेफर करण्याचा सोपा मार्ग अवलंबिला जात आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाची भलीमोठी इमारत तयार केली; परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षकांसह ग्रामीण रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकारी पदे कंत्राटी पद्धतीवर असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी कोविड आयसीयू सेंटर उभारले आहे. या कोविड सेंटरमध्ये दहा बेड तयार करून अति गंभीर आजाराच्या रुग्णांना उपचार करण्यात यावा, अशी सोय ग्रामपंचायतीने तयार केली; परंतु याठिकाणी निर्णय घेण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधीक्षक सतत गैरहजर असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची ३ पदे मान्य असून, कंत्राटी पद्धतीवर भरण्यात आले आहेत. यासह कोविड सेंटरला दोन वैद्यकीय अधिकारी तेसुद्धा कंत्राटी पद्धतीवर पदे भरण्यात आली आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षकांसह तीन वैद्यकीय अधिकारी पदे कायमस्वरूपी भरावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था नाही
बोरी ग्रामीण रुग्णालयात सेंटरमध्ये तीस ते पस्तीस रुग्णांवर उपचार सुरू असून, या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणी कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णांना दिलासा देण्यासाठी २४ तास विद्युत पुरवठा या ठिकाणी असणे गरजेचे आहे.