संचारबंदी नव्हे फक्त दुकान बंदीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:17 IST2021-03-27T04:17:59+5:302021-03-27T04:17:59+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत सरासरी सव्वा तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. कोरेानाचा हा ...

संचारबंदी नव्हे फक्त दुकान बंदीच !
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत सरासरी सव्वा तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. कोरेानाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यात २४ मार्च रोजी सायंकाळी ७ ते १ एप्रिल सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीतून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. शिवाय अन्यही काही बाबींच्या अनुषंगाने सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रस्त्यावर संचारबंदी कालावधीत बाजारात, गल्लीत किंवा घराबाहेर फिरताना आढळून आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भारतीय दंडसंहिता १८६० चे कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता; परंतु हा इशारा फक्त कागदावरच असल्याचा अनुभव जिल्हावासीयांना गेल्या दोन दिवसांपासून अनुभवयास येत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ सुरू आहे. जिल्ह्यात खासगी व प्रवासी सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी असतानाही सर्रास वाहनांची ये-जा सुरू असल्याचे दिसून आले. शहरातील डॉक्टरलेन, जिंतूर रोड, वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते ग्रँड कॉर्नर, धार रोड, वांगी रोड, पाथरी रोड, गंगाखेड रोड आदी भागांत वाहनधारक निसंकोच रस्त्यावर फिरताना आढळून आले. अनेक नागरिकही दुचाकीवर तसेच रस्त्याने चालतानाही दिसून आले. विशेष म्हणजे नागरिक रस्त्यावर असताना संचारबंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करणारी पोलीस यंत्रणा मात्र गायब असल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीऐवजी दुकान बंदी आदेश लागू केला आहे की काय? असा सवाल व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात होता.
तालुक्याच्या ठिकाणीही अशीच स्थिती
परभणी शहराबरोबरच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या ठिकाणीही अशीच स्थिती पहावयास मिळाली. सेलू येथे संचारबंदीचे उल्लंघन करून नागरिक रस्त्यावर फिरताना आढळून आले. दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहने रस्त्यावर दिसून आली. पालम शहरातील मुख्य चौकात तसेच नवा मोंढा, बसस्थानक तसहील कार्यालय परिसर, फरकंडा रस्ता आदी भागातही नागरिकांची वर्दळ होती. पोलीस मात्र गायब होते. पाथरी शहरात सकाळी व सायंकाळी रस्त्यावर नागरिक होते. दुपारी मात्र तुरळक प्रमाणात नागरिक दिसून आले. जिंतूर शहरातही संचारबंदीचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. सकाळपासूनच शहरातील रस्त्यावर नागरिक पहावयास मिळाले. याशिवाय फळ विक्रेत्यांनीही आपली दुकाने थाटली होती. काही भागात हॉटेलचालकांनी समोरून शटर बंद ठेवून आत मात्र नागरिकांच्या चहापानाची व्यवस्था केली होती. महसूल किंवा पोलीस विभागाचे अधिकारी मात्र गायब होते.