परभणीत शासनाच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 'निर्भय मॉर्निंग वॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:06 IST2018-08-20T16:04:15+5:302018-08-20T16:06:37+5:30

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज सकाळी शहरातून 'निर्भय मॉर्निंग वॉक' काढून निषेध नोंदविण्यात आला़ 

The Nirbhay Morning Walk of the Superstition Nirmulan Samiti on the protest against government in Parbhani | परभणीत शासनाच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 'निर्भय मॉर्निंग वॉक'

परभणीत शासनाच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा 'निर्भय मॉर्निंग वॉक'

परभणी- नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज सकाळी शहरातून 'निर्भय मॉर्निंग वॉक' काढून निषेध नोंदविण्यात आला़ 

२० आॅगस्ट रोजी डॉ़ नरेंंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण होत आहेत़ तर ज्येष्ठ कामगार नेते कॉ़ गोविंद पानसरे,  माजी कुलगुरु प्रा़ डॉ़ एम़एम़ कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या़ त्या सर्व घटना षडयंत्र असून, नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्या़ मात्र या प्रकरणांमध्ये तपासी यंत्रणांना अजूनही आरोपींचा शोध लागला नाही़ त्यामुळे तपासी यंत्रणा व शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मॉर्निंग वॉक काढण्यात आला़ 

सकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली़ या अनोख्या आंदोलना दरम्यान, आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली़ राजगोपालाचारी उद्यानात या निर्भय मॉर्निंग वॉकचा समारोप झाला़ यावेळी अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ़ रविंद्र मानवतकर, सचिव प्राचार्य डॉ़ विठ्ठल घुले यांनी मनोगत व्यक्त केले़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी तपासी यंत्रणांनी आरोपींना ताब्यात घेतले़ परंतु, या हत्या प्रकरणातील षडयंत्र नेमके कोणाचे? त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे़ देशातील तपासणी यंत्रणांना ५-५ वर्षांपर्यंत आरोपींचा शोध लागत नसेल तर हे यंत्रणांचे अपयश असल्याचेही यावेळी मानवतकर, प्राचार्य घुले यांनी नमूद केले़.

आंदोलनात कॉ किर्तीकुमार बुरांडे, प्राचार्य डॉ़ शिवाजीराव दळणर, कॉ़ राजन क्षीरसागर, डॉ़ परमेश्वर साळवे, अ‍ॅड़ लक्ष्मण काळे, नितीन सावंत यांचीही भाषणे झाली़ मुंजाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले़. डॉ़ सुनील जाधव, महाजन, रंगनाथ चोपडे, रहीम भाई, लक्ष्मण जोगदंड  यांच्यासह नवरचना प्रतिष्ठानचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते़.

Web Title: The Nirbhay Morning Walk of the Superstition Nirmulan Samiti on the protest against government in Parbhani