गल्लीबोळातील रात्रीचा प्रवास धोक्याचाच; अनेक झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:21 IST2021-09-14T04:21:52+5:302021-09-14T04:21:52+5:30
परभणी : शहरातील गल्लीबोळामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळातून गल्लीतील रस्त्यांवरू घर गाठताना चांगलीच ...

गल्लीबोळातील रात्रीचा प्रवास धोक्याचाच; अनेक झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा!
परभणी : शहरातील गल्लीबोळामध्ये मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळातून गल्लीतील रस्त्यांवरू घर गाठताना चांगलीच कसरत करावी लागते. मनपाकडे पशुवैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने समस्या आणखीच वाढली आहे.
मागील काही दिवसांपासून शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. दिवसा ठीक पण रात्रीच्या वेळी प्रत्येक गल्ली-बोळातून जायचे झाल्यास मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. मनपाच्या कोंडवाडा विभागाच्या वतीने या मोकाट कुत्र्यांना पकडले जाते. मात्र प्राणीप्रेमींकडून यावर आक्षेप घेतला जात आहे. आपल्याकडे पशुवैद्यकीय अधिकारीच नसेल तर कुत्रे पकडतात कशाला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे केवळ पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडून शहराबाहेर नेऊन सोडण्याचे काम मनपाच्या वतीने केले जात आहे.
दर्गा रोड, विद्यानगर भागात जरा जपून
शहरातील दर्गा रोड परिसर तसेच विद्यानगर, नानलपेठ, वसमत रोड या भागात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रात्रीच्या वेळी या भागातून जाताना या मोकाट कुत्र्यांचीच भीती अधिक वाटते. विशेष म्हणजे पर्यायी रस्ता निवडला तरीही त्या ठिकाणी मोकाट कुत्रे असतातच. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
आम्हास चोरांची नव्हे कुत्र्यांची भीती वाटते
दर्गा रोड भागात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. महिला आणि लहान मुलांना रस्त्यांवरून फिरताना त्रास वाढला आहे. मनपाने कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
सलीम इनामदार
मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या भागात मोकाट कुत्रे पकडण्यात आले होते. मात्र पुन्हा कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेतल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असल्ला खान
दोन वर्षांपासून निर्बीजीकरण रखडले
महानगरपालिकेतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून कुत्र्यांचे निर्बीजीकरणच झाले नाही. त्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. तसेच ॲन्टिरेबीज इंजेक्शनही दिले नसल्याने कुत्र्यांनी चावा घेतल्यास नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
प्रक्रिया सुरू
पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने या विभागाचे काम ठप्प आहे. त्यामुळे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी सक्षम एजन्सी नेमण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे. त्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच या कामासाठी एका एजन्सीची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळाली.