वर्षभरात ६३८ महिलांची नैसर्गिक प्रसूती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:13+5:302021-04-02T04:17:13+5:30
देवगाव फाटा : गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणेवर कोरोनामुळे मोठा ताण आला असतानाही सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात या कालावधीत ६३८ ...

वर्षभरात ६३८ महिलांची नैसर्गिक प्रसूती
देवगाव फाटा : गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणेवर कोरोनामुळे मोठा ताण आला असतानाही सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात या कालावधीत ६३८ महिलांची नैसर्गिक प्रसूती झाली असून, १६९ महिलांचे सिझर झाले असल्याची माहिती या विभागाच्या वतीने देण्यात आली.
मार्च २०२० मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा शोध, उपचार, जनजागृती आदींच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. जूननंतर आरोग्य यंत्रणेवरील ताण हळूहळू सैल होत असताना पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे बहुतांश लक्ष कोरोनावरील उपचाराकडे लागले आहे. अशातच सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयाने कोरोनाबाधितांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करीत असताना नियमितपणे करण्यात येणाऱ्या कामांवरही तेवढेच लक्ष दिले आहे. शासकीय रुग्णालय म्हटले की, गंभीर रुग्णांना रेफर करण्याच्याच घटना आतापर्यंत घडल्या; परंतु सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयाने मात्र नवीन पायंडा पाडला आहे. मार्च २०२० ते मार्च २०२१ या एक वर्षाच्या काळात या रुग्णालयात ६३८ महिलांची नैसर्गिक प्रसूती करण्यात आली, तर १६९ महिलांचे सिझेरियन करण्यात आले. प्रसूतीदरम्यान बाळ आडवे होणे, गर्भातील पाणी कमी होणे, रक्तस्राव होणे, अशा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा यात समावेश आहे. यासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय हरबडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संतोष देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. अरुण रोडगे, डॉ. कृष्णा पवार, परिचारिका विमल मेटे, अश्विनी कुमावत, मुक्ता गुट्टे यांचे यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या या प्रसूती पॅटर्नमुळे ग्रामीण भागात शासकीय रुग्णालयाविषयी सकारात्मक संदेश गेला आहे.
५०९ शिशूंवर वर्षभरात उपचार
प्रसूतीनंतर नवजात शिशूचा मृत्यूदर कमी व्हावा, या उद्देशाने उपजिल्हा रुग्णालयात नवजात शिशू अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागात कमी वजन असलेली बालके किंवा कावीळ आजार झालेली बालके यांच्यावर बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय गोरे, डॉ. कृष्णा पवार यांच्या मार्गदर्शनात फोटोथेरेपीद्वारे उपचार करण्यात येतो. वर्षभरात अशा ५०९ शिशूंवर उपचार करण्यात आले आहेत.
महिनानिहाय महिलांची नैसर्गिक प्रसूती संख्या
महिना नैसर्गिक सिझेरियन
मार्च २०२० ५२ ०१
एप्रिल ४४ ०२
मे ४५ ००
जून २८ ०३
जुलै ५१ २३
ऑगस्ट ७० १८
सप्टेंबर ६० १८
ऑक्टोबर ७३ १९
नोव्हेंबर ६१ १४
डिसेंबर ४५ १९
जानेवारी २०२१ ३५ १७
फेब्रुवारी ३५ १२
मार्च ३९ २३