पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात युवकांवर हल्ला; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 19:50 IST2022-07-14T19:50:19+5:302022-07-14T19:50:46+5:30
काही युवकांनी पाचलेगाव रस्त्याकडे जाणाऱ्या कमानीजवळ धारदार शस्त्राने अक्षरशः सिनेस्टाईल दोघा युवकांवर जोरदार हल्ला चढवला.

पूर्ववैमनस्यातून भररस्त्यात युवकांवर हल्ला; एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
जिंतूर (परभणी) : अज्ञात युवकांनी धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून केल्याची थरारक घटना शहरातील पाचलेगाव कमानीजवळ आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. अफोरोज बेग इमरोज बेग मिर्झा (२१ ) असे मृताचे नाव आहे. तर या हल्ल्यात सोमेश विलास थिटे हा युवक गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, हा हल्ला मागील भांडणाच्या कारणावरून झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पाचलेगाव रस्त्याकडे जाणाऱ्या कमानीजवळ धारदार शस्त्राने अक्षरशः सिनेस्टाईल दोघा युवकांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात अफोरोज बेग इमरोज बेग मिर्झा (वय 21) व सोमेश विलास थिटे हे दोघे युवक गंभीर जखमी झाले. त्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु, अफोरोज बेग यास वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. तर सोमेश यास प्राथमिक उपचार करीत परभणी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयाकडे हलविले आहे.
ग्रामीण रुग्णालयाची केली तोडफोड
गंभीर जखमी दोघांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टर तात्काळ उपलब्ध न झाल्याने जमावाने रुग्णालयात तोडफोड केली. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणाव वाढला होता. माहिती मिळताच पोलिस कर्मचारी घटनास्थळी धावून आले. जमाव पांगवतांना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, मृत अफोरोज बेग इमरोज बेग मिर्झा हा एका गुन्ह्यात आरोपी होता. काही दिवसांपूर्वीच तो जेलबाहेर आला होता. याच गुन्ह्याच्या कारणातून काही लोकांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे.