लसीकरणापूर्वी रक्तदानाची सुरू झाली चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:06+5:302021-04-02T04:17:06+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याची चळवळ सुरू झाली आहे. लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन लोकमतने केले ...

लसीकरणापूर्वी रक्तदानाची सुरू झाली चळवळ
परभणी : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याची चळवळ सुरू झाली आहे. लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन लोकमतने केले होते. त्यानुसार या आवाहनास आता प्रतिसाद मिळू लागला आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग आला आहे. नागरिक मोठ्या संख्येने लसीकरण करून घेत आहेत; परंतु त्याचा दुसरा परिणाम रक्तदानावर होऊ लागला आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर किमान २८ दिवस लसीकरण करणाऱ्याला रक्तदान करता येत नाही. सध्या कोरोनाचा वाढलेला संसर्ग लक्षात घेता रक्तदान शिबिरांची संख्या घटली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या रक्तपेढीत रक्तसाठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता, ‘लोकमत’ने कोरोना लसीकरण करण्यापूर्वी रक्तदान करून घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत दोन दिवसांपूर्वी वैभवसिंह ठाकूर यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान केले आहे. विशेष म्हणजे, त्यांचे हे ४२ वे रक्तदान ठरले. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत असलेल्या अनिकेत सराफ आणि राहुल शिरसेवाड यांनीही रक्तदान मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. त्याचप्रमाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातही ३१ मार्च रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यात २४ जणांनी रक्तदान केले आहे.
एकंदर कोरोनाची लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याची मोहीम आता सुरू झाली असून, रक्तपेढीमध्ये हळूहळू रक्ताचा साठा उपलब्ध होऊ लागला आहे. इतरांनीही या मोहिमेत सहभागी होऊ रक्तदान करून घ्यावे, असे आवाहन येथील शासकीय रक्तपेढीतील उद्धव देशमुख यांनी केले आहे.
दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज
येथील जिल्हा रक्तपेढीतून दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची मागणी होत आहे. जिल्ह्यातील थालेसिमियाग्रस्त रुग्णांना प्रत्येक महिन्याला रक्त द्यावे लागते; परंतु रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्त उपलब्ध करून देताना रक्तपेढीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागते. निर्माण झालेला हा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.