विषारी सापावर ताईंनी टोपले झाकले आणि कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:14 IST2021-06-01T04:14:04+5:302021-06-01T04:14:04+5:30
परभणी : मध्यरात्री अचानक जाग आली; पण समोर वळवळ करणारा साप दिसला, तर घाबरगुंडी उडणे साहजिक आहे. मात्र, अशाही ...

विषारी सापावर ताईंनी टोपले झाकले आणि कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला
परभणी : मध्यरात्री अचानक जाग आली; पण समोर वळवळ करणारा साप दिसला, तर घाबरगुंडी उडणे साहजिक आहे. मात्र, अशाही परिस्थितीत समयसूचकता राखत मथुरानगरातील अनुराधा लोया यांनी घरात आढळलेल्या सापावर लोखंडी टोपले झाकले अन् त्यास पळून जाण्यास वाव मिळाला नाही. काही वेळानंतर सर्पमित्रांनी घटनास्थळी दाखल होत सापाला अलगद पकडून सर्वांना भयमुक्त केले.
शहरातील मथुरानगर भागातील लोया कुटुंबीयांच्या घरातील हा प्रसंग. शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अनुराधा लोया यांना अचानक जागा आली अन् जवळच्या खोलीतच साप वळवळत असल्याचे दिसून आले. घाबरलेल्या अवस्थेतही त्यांनी घरातून लोखंडी टोपले आणून त्या सापावर झाकून ठेवले. त्यानंतर कुटुंबीयांना ही माहिती दिली. घरात साप असल्याने सर्वजण काळजीत पडले होते. अशा वेळी याच भागातील संतोष जाधव यांनी तातडीने सर्पमित्र रणजित कारेगावकर यांच्याशी संपर्क साधला. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कारेगावकर यांनी या भागात जाऊन सापाला पकडून सर्वांना भयमुक्त केले. मण्यार जातीचा हा साप असून तो अत्यंत विषारी असल्याचे कारेगावकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, या घटनेपूर्वीच मथुरानगर भागातच शनिवारी रात्री साधारणतः साडेदहा वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र उद्योजकता विकास प्रकल्पाचे अधिकारी शंकरराव पवार यांच्या निवासस्थानातही मण्यार या जातीचा साप आढळला होता. सर्पमित्र रणजित कारेगावकर व वेदांत माळवटकर यांनी पकडून पवार कुटुंबीयांना भयमुक्त केले होते.
कसा ओळखणार मण्यार?
नागापेक्षाही १५ पटीने जहाल विषारी असलेला हा साप आहे. सहसा रात्री वावरतो. त्यामुळे त्यास नाइट रायडर म्हणूनही ओळखले जाते. काळ्या नीळसर जांभळ्या किंवा गडद तपकिरी रंगाचा असतो. डोके गडद काळे असते. अंगावर पांढरे जोडीदार पट्टे, ते खालच्या बाजूस A आकाराचे झालेले असतात. हे खवले शेपटीकडे अधिक व डोक्याकडे कमी कमी होत जातात. हा साप जुनी व पडकी घरे, शेत, बाग, विटा, दगड व ओलसर जागी आढळतो. घरात आल्यास रात्री अंथरूणात घुसतो व माणसाच्या गर्मीला झोपतो. जरीशीही हालचाल झाली आणि याला धक्का लागला की हा कडकडून दंश करतो. कधी कधी हा चावल्याचे कळतही नाही. चावल्यावर प्रचंड तहान लागते, पोटदुखी सुरू होते व श्वास घेण्यास त्रास होतो. त्वरित इलाज नाही मिळाला तर रुग्ण दगावूही शकतो, अशी लक्षणे अढळल्यास त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करावे. जमिनीवर झोपत असाल तर भिंतीपासून व ओलसर जागेपासून लांब झोपा. आजूबाजूला नियमित स्वच्छता ठेवा. अंथरूण रोज झटकूनच अंथरा, घरा समोर विटा, पडके सामान ठेवलेले असेल तर ते स्वच्छ करा. घाबरू नका, काळजी घ्या आणि जर घरात दिसलाच तर त्वरित सर्पमित्रांना बोलवा, असे आवाहन रणजित कारेगावकर यांनी केले आहे.