मानवत हादरले! हॉटेलबाहेर चहा पीत असताना वाद वाढला, एकाचा टिकावाच्या घावात खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 16:35 IST2025-07-26T16:34:21+5:302025-07-26T16:35:54+5:30
या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मानवत हादरले! हॉटेलबाहेर चहा पीत असताना वाद वाढला, एकाचा टिकावाच्या घावात खून
मानवत (जि. परभणी) : शहरातील वळण रस्त्यावर करंजी नाका परिसरात आज, शनिवारी ( दि. २६) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली पवार (रा. कोक्कर कॉलनी) यांचा डोक्यात टिकावाने वार करून निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत पवार हे करंजी नाका येथील एका हॉटेलशेजारी चहा घेत बसले होते. दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी वाद घालून अचानक त्यांच्या डोक्यात टिकावाने घाव घातला. हा घाव इतका जबरदस्त होता की, माऊली पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप बोरकर, प्रमोद देवकते, किशन पतंगे, शेख जावेद, नरेंद्र कांबळे, शरीप पठाण, शेख मुन्नू आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह मानवत ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.