Maharashtra Election 2019 :भाजप सरकार सत्तेत आल्यास आणखी पाच बँका बुडतील -प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:48 IST2019-10-15T14:38:22+5:302019-10-15T14:48:52+5:30
गरीबांना गरीब ठेवण्यासाठी या शासनाने देशात मंदी आणल्याचा आरोपही त्यांनी केला़

Maharashtra Election 2019 :भाजप सरकार सत्तेत आल्यास आणखी पाच बँका बुडतील -प्रकाश आंबेडकर
परभणी : केंद्रातील भाजप सरकारने आतापर्यंत दोन बँका बुडविण्याचे काम केले़ राज्यात हे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर आणखी पाच राष्ट्रीयीकृत बँका बुडतील़ त्यामुळे मतदारांनी विचार करून मतदान करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले़
परभणी येथे सोमवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते़ ते म्हणाले, एकाही राजकीय पक्षाने पाच वर्षांत काय काम करणार, हे सांगितले नाही़ कुठलाही विकासाचा कार्यक्रम हाती घेतला नाही़ आम्ही मात्र पाच वर्षांत काय करणार हे सांगितले आहे़ देशातील प्रत्येक नागरिकांकडून ईजीएस नावाचा कर वसूल केला जातो़ वर्षभरात या करापोटी २२ हजार कोटी रुपये जमा होतात़ या करातून बेरोजगार युवकांना रोजगार देणे किंवा त्यांना रोजगार भत्ता देणे अपेक्षित आहे़ मात्र भाजप सरकारने २२ हजार कोटी रुपये रस्त्यांच्या कामासाठी तारण म्हणून ठेवले आहेत़ गरीबांना गरीब ठेवण्यासाठी या शासनाने देशात मंदी आणल्याचा आरोपही त्यांनी केला़ वंचित आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक बेरोजगाराला काम देऊ किंवा बेरोजगार भत्ता देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली़