सोशल मीडियावरील मैत्रिणीने केली लाखोंची फसवणूक; नोकरीचे आमिष देऊन उकळले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 15:33 IST2021-06-01T15:23:49+5:302021-06-01T15:33:32+5:30
गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगरात राहणाऱ्या विवेक श्रीरंग शिसोदे यांची नांदेड जिल्ह्यातील एका तरूणीसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख

सोशल मीडियावरील मैत्रिणीने केली लाखोंची फसवणूक; नोकरीचे आमिष देऊन उकळले पैसे
गंगाखेड ( परभणी ) : सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या तरूणीने मुंबई येथे नोकरी लावण्याचे आमिष देऊन तरुणाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. विमानतळावर वरिष्ठ अभियंता म्हणून नौकरी लावण्यासाठी तरुणीने १२ लाख १६ हजार ६०० रुपये उकळून फसवणूक केली. याप्रकरणी दि. ३१ मे रोजी रात्री उशीरा गंगाखेड पोलीस ठाण्यात तरूणीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड शहरातील व्यंकटेश नगरात राहणाऱ्या विवेक श्रीरंग शिसोदे यांची नांदेड जिल्ह्यातील एका तरूणीसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला मुंबई येथील विमानतळावर नौकरी लागल्याचे तिने विवेक शिसोदे यास सांगितले. वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत ओळख झाल्याने तुला पण विमानतळावर वरीष्ठ अभियंता म्हणून नौकरी लावते असे तरुणीने सांगितले. यानंतर नौकरीच्या कामासाठी काही पैसे लागणार असे सांगून दि. १९ जुलै २०१९ रोजी ८२,४०० रुपये आणि डिसेंबर २०२० अखेरपर्यंत वेगवेगळ्या तारखेला एकूण ९ लाख ७९ हजार २०० रुपये उकळले. मात्र, नोकरी लागलीच नसल्याने विवेक यांनी पैसे परत मागितले. यावर तरुणीने तू दिलेली रक्कम पुढे भरली होती पण तू रिजेक्ट झाला. त्यामुळे पैसे परत मिळणार नाहीत असे सांगितले. विवेक याने पुन्हा पैसे मागताच आत्महत्या करण्याची धमकी देत पैसे देण्यास टाळाटाळ केली. दरम्यान, कर्ज काढून पैसे परत करते असे सांगून पुन्हा जानेवारी २०२१ ते एप्रिल या काळात १ लाख ५५ हजार रुपये घेतले. परंतु,
नोकरी पण मिळाली नाही आणि तरुणीने पैसेही परत दिले नाही.
अशा प्रकारे जुलै २०१९ ते एप्रिल २०२१ दरम्यान एकूण १२ लाख ६ हजार ६०० रुपये तरुणीने घेतले. पैसे परत मागितले तर आत्महत्या करण्याची धमकी देत टाळाटाळ करून फसवणूक केल्याची फिर्याद विवेक शिसोदे यांनी दिल्यावरून दि. ३१ मे सोमवार रोजी रात्री उशीराने निकिता रामेश्वर चंदेल हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सपोनि बालाजी गायकवाड हे करीत आहेत.