'चुका, उणिवांचा शोध घ्या'; आढावा बैठकीत लोकसभेसाठी सज्ज राहण्याचे शरद पवारांचे निर्देश
By ज्ञानेश्वर भाले | Updated: May 31, 2023 16:42 IST2023-05-31T16:40:24+5:302023-05-31T16:42:17+5:30
आगामी काळातील सत्तासंघर्ष अत्यंत टोकाला जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्या जात आहे.

'चुका, उणिवांचा शोध घ्या'; आढावा बैठकीत लोकसभेसाठी सज्ज राहण्याचे शरद पवारांचे निर्देश
परभणी : लोकसभा निवडणुकीचे नगारे वाजत असून, सर्वच पक्ष आपापल्या परीने आगामी निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे चित्र आहेत. आगामी काळातील सत्तासंघर्ष अत्यंत टोकाला जाण्याची शक्यता असल्याने राज्यातील मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी परभणीसह राज्यातील इतर काही लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत वेळ आलीस तर लढण्यास सज्ज राहा, असे निर्देश जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले. यासह गतकाळात झालेल्या चुका, उणिवा दूर करून आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी काय करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश पवारांनी आढावा बैठकीत दिले.
लोकसभा निवडणुकीच्या आखाड्याला एक वर्षापेक्षा कमी कालावधी आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षाकडून आपापले मतदारसंघ बळकट कसे करता येईल, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. त्यातच भाजपकडून सर्वच मतदारसंघाची चाचपणी सुरू असल्याने त्यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा प्रयत्न होत आहे. त्यात जागा वाटपाचा तिढा सध्या तरी कायम असला तरी प्रत्येक पक्षाकडून आपापले मतदारसंघ बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी परभणीसह राज्यातील नऊ लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती, आगामी निवडणुका याबाबत त्या-त्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधींकडून माहिती जाणून घेतली.
चुका, उणिवांचा शोध घ्या
परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असून मतदारांचा कौल सुद्धा राष्ट्रवादीच्या बाजूने आहे. मग लोकसभेच्या आखाड्यात आपल्याला पराभवाचा सामना का करावा लागतो, असा प्रश्न या आढावा बैठकीत शरद पवारांनी उपस्थित केला. त्यामुळे गतकाळात झालेल्या चुका, उणिवांसह अंतर्गत हेवेदावे दूर करत सक्षम जिल्हा म्हणून परभणी कसा पुढे येईल, यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
विद्यमान खासदारांसह भाजपची भूमिका घेतली समजून
परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांच्यासह जिल्ह्यात भाजपकडून सुरू असलेल्या रणनीतीचा सुद्धा या बैठकीत आढावा घेण्यात आला. गतकाळात वंचित बहुजन आघाडीमुळे आपल्या उमेदवाराचा पराभव झाला, अशी स्थिती होती. परंतु आता त्यांचा फॅक्टर नाही, त्यामुळे आगामी काळात काय होऊ शकते त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.