संसार सोडून निघाली पण वाटेतच संशयी प्रियकराने रॉडने ठेचून विवाहित प्रेयसीचा केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:45 IST2025-12-18T16:44:22+5:302025-12-18T16:45:01+5:30
२६ नोव्हेंबरपासून बेपत्ता विवाहितेचा अखेर मृतदेहच आणण्याची वेळ; खून करून करंजी घाटात फेकला मृतदेह

संसार सोडून निघाली पण वाटेतच संशयी प्रियकराने रॉडने ठेचून विवाहित प्रेयसीचा केला खून
पाथरी (जि.परभणी) : तालुक्यातील वरखेड येथील एका विवाहितेशी प्रेमसंबंध ठेवणाऱ्या प्रियकराने लग्नासाठी आळंदीला घेऊन जात असताना चारित्र्यावर संशय घेत डोक्यावर रॉडने मारून तिचा खून केला. अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी घाटामध्ये तिचा मृतदेह फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार १७ डिसेंबर रोजी उघड झाला. २६ नोव्हेंबरपासून ही महिला लाखाची रोकड व दागिने घेऊन बेपत्ता झाली होती.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, वरखेड येथील नीता त्र्यंबक ढगे (वय ३०) ही महिला २६ नोव्हेंबर रोजी गावातून निघून गेली. पाथरी ठाण्यात दुसऱ्या दिवशी नातलगांनी माहिती दिली. मात्र, ती परत येणार असल्याचे कळाल्याने तक्रार दिली नाही. मात्र, ती आलीच नसल्याने ४ डिसेंबर रोजी मिसिंग दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी चौकशीत तिच्या मोबाइलचा सीडीआर काढला. यात ती जिजा वाघमारे (रा. फुलवाडी, जि. जालना) याला वारंवार फोन करीत असल्याचे आढळले. त्यानंतर जिजा वाघमारेला वरखेड येथील हाजू पठाणच्या मोबाइलनंबरून कॉल आल्याचे आढळले. पोलिसांनी हाजू पठाण याचा शोध घेतला. १५ डिसेंबर रोजी त्याला बीड जिल्ह्यातून उचलले. चौकशीत या खून प्रकरणाचा उलगडा झाला.
नीता ढगे आणि जिजा वाघमारे यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पती व दोन मुले असताना तिचे हे संबंध होते. ते दोघे लग्न करण्यासाठी २६ नोव्हेंबरच्या सायंकाळी फुलवाडी येथून आळंदीला जात होते. त्यांच्यासोबत लग्नासाठी साक्षीदार म्हणून हाजू पठाण होता. बीड ते अहिल्यानगरदरम्यान ढाब्यावर जेवण करत असताना संशयावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या दरम्यान जिजा याने रस्त्यात थांबून नीता ढगे हिच्या डोक्यात रॉड घालून ठार मारले. मृतदेह करंजी घाट (ता. पाथर्डी) हद्दीत टाकून दिला, अशी माहिती हाजू पठाणने पाथरी पोलिसांना दिली. १७ डिसेंबर रोजी सकाळी सहायक पोलिस निरीक्षक नरके आणि पथक घटनास्थळी रवाना झाले. तेथे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला.
मिसिंग ते खुनाचा उलगडा
महिलेची मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर पाथरीचे पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ नरके, पोलिस निरीक्षक संतोष मरळ, हेडकॉन्स्टेबल रामा हातागळे यांना सीडीआरची बारकाईने तपासणी करण्यास सांगितले. यावरूनच धागेदोरे शोधत या खुनाचा उलगडा केला. मुख्य आरोपीचा मोबाइल क्रमांक बंद असल्याने तो हाती लागला नाही.