जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी नेत्यांची पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:17 IST2021-04-04T04:17:59+5:302021-04-04T04:17:59+5:30
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपूडकर यांच्या गटाचे २१ पैकी ११ सदस्य निवडून आले ...

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी नेत्यांची पायपीट
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश वरपूडकर यांच्या गटाचे २१ पैकी ११ सदस्य निवडून आले आहेत. तर भाजपाचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाचे ९ सदस्य निवडून आले आहेत. एक अपक्ष निवडून आला आहे. सद्यस्थितीत वरपूडकर गटाचे पारडे जड असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी बँकेचे अध्यक्षपद देणाऱ्यांस आपल्या चार सदस्यांचा पाठिंबा राहील, अशी गुगली टाकल्याने वरपूडकर गट अस्वस्थ झाला आहे. शिवाय दुर्राणी यांनी निकालानंतर आम्हाला गृहीत धरू नये, असा बाऊंसर टाकून बोर्डीकर गटातही अस्वस्थता निर्माण केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात आ. दुर्राणी यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत बँकेचे नूतन संचालक तथा वसमतचे आ.राजू नवघरे, माजी जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर व राष्ट्रवादीचे दत्तात्रय मायंदळे यांची उपस्थिती होती. यावेळी आ. दुर्राणी यांनी अध्यक्षपदाच्या निवडीबाबत राजकीय गणिते अजित पवार यांच्यासमोर मांडली. पक्षाला अध्यक्षपद मिळू शकते, असे सांगितले. त्यावर पवार यांनी सकारात्मककता दाखविली असल्याचे समजते. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नावाचे आ. वरपूडकर यांच्या पॅनलने सर्वाधिक जागा मिळविल्या. आ. दुर्राणी व आ. वरपूडकर यांच्यात तीव्र मतभेद आहेत. या पार्श्वभूमीवर आ. दुर्राणी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचे समजल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच आ. वरपूडकर यांनीही मुंबई गाठून वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याचे समजते. दुसरीकडे बोर्डीकर गटही अध्यक्षपद मिळविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहे. अडीच वर्षे अध्यक्षपद आपल्याकडे ठेवून पुढील अडीच वर्षे आ. दुर्राणी यांना देण्याची चाचपणीही या गटाकडून सुरू असल्याचे समजते. तशी प्राथमिक चर्चाही झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. परंतु, पहिल्यांदा अध्यक्षपद कोण घेणार यावरून एकमत होत नसल्याने अंतिम निर्णय होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा बँकेच्या सभागृहात अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे वरपूडकर-बोर्डीकर दोन्ही गटांकडून जोरदार लॉबींग केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बँकेच्या अध्यक्षपदाकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.