तीन वर्षांपासून केंद्रीय विद्यालयाला मिळेना इमारत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:17 IST2021-04-07T04:17:44+5:302021-04-07T04:17:44+5:30
परभणी : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या केंद्रीय विद्यालयासाठी मागील तीन वर्षांपासून हक्काची इमारत मिळत नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...

तीन वर्षांपासून केंद्रीय विद्यालयाला मिळेना इमारत
परभणी : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या केंद्रीय विद्यालयासाठी मागील तीन वर्षांपासून हक्काची इमारत मिळत नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
परभणी जिल्ह्यासाठी २०१८-१९ या वर्षात केंद्रीय विद्यालयाला मंजुरी मिळाली. केंद्रीय विद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे. त्यानुसार गंगाखेड रोडवरील ब्राह्मणगाव शिवारात या विद्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र इमारत बांधकाम होईपर्यंत पर्यायी स्वरूपात शाळेसाठी इमारत देण्याची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयाने करणे आवश्यक आहे. सुरुवातीला आयटीआय येथील इमारत या शाळेसाठी देण्यात आली. मात्र त्या ठिकाणी कोविड सेंटर सुरू केल्याने पुन्हा विद्यार्थ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या शाळेसाठी केवळ एक खोली दिली आहे. त्यामुळे ऑनलाईन क्लासेस कसे सुरू करावेत, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. इंटरनेट आणि इतर भौतिक सुविधाही उपलब्ध करताना अडचणी येत आहेत. शिवाय कोरोनाचा संसर्ग ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्यासाठी इमारतच नसल्याने या अडचणीत वाढ झाली आहे. सध्या या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालवले जातात. ३५९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षालाही १ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे ऑनलाइन क्लासही घेताना शाळेसमोर अडचणी उभ्या टाकल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रश्नी लक्ष घालून केंद्रीय विद्यालयसाठी लवकर इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.