मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यातील ओढ्या-नाल्यांना पाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 15:53 IST2018-08-20T15:51:40+5:302018-08-20T15:53:12+5:30
- सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली

मुसळधार पावसाने परभणी जिल्ह्यातील ओढ्या-नाल्यांना पाण
परभणी- सोमवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, दिवसभर मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या-नाल्यांना पाणी आले असून, हा पाऊस प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढण्यासाठी पोषक ठरणार आहे.
जुलै महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली होती़ १६ आॅगस्ट रोजी पावसाचे पुनरागमन झाले़ मात्र एकच दिवस हा पाऊस बरसला़ त्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या़ दरम्यान, २० आॅगस्ट रोजी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता दूर झाल्या आहेत़ परभणी शहर व परिसरात पहाटे पावसाला सुरुवात झाली़ सुरुवातीला रिमझिम पाऊस झाला़ सकाळी १० वाजेनंतर मात्र पावसाचा जोर चांगलाच वाढला़ दुपारी २ वाजेपर्यंत शहर परिसरात मुसळधार पाऊस झाला़ दुपारी ३ वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम होता़
परभणी शहराबरोबरच जिंतूर, मानवत, पालम, सोनपेठ, पूर्णा, सेलू तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली आहे़ सर्वदूर पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावले आहेत़ जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अजूनही कोरडे असून, या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे़
४२ मिमी पाऊस
परभणी शहर व परिसरात सोमवारी पहाटेपासून दुपारी २.३० वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने घेतली आहे़ दिवसभरात ४२.२ मिमी पाऊस झाल्याची माहिती या विभागातून देण्यात आली़