जिल्ह्यात मागील वर्षी सिमेंट बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे व सिंचन तलाव अशा १ हजार १०७ जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धोकादायक असलेल्या जलसंधारण आणि सिंचन प्रकल्पाच्या कामाची तपासणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित यंत्रणांना तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी उप अभियंता यांच्यामार्फत उपविभागीय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता यांच्यामार्फत तपासणीचे काम हाती घेतले. प्रकल्पाची पाणी पातळी, पाणी पातळीच्या रजिस्टरमध्ये घेतलेल्या नोंदी, अतिवृष्टीमध्ये धोका निर्माण होणाऱ्या तलावांची माहिती घेऊन त्या-त्या गावातील जि. प. सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांची तपासणी पूर्ण झाली असल्याची माहिती जलसंधारण अधिकारी गंगाधर यंबडवार यांनी दिली.
जलसंधारण प्रकल्पांची तपासणी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:18 IST