उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 04:56 PM2020-10-16T16:56:40+5:302020-10-16T17:00:05+5:30

coronavirus unlock जे काही उद्योग टिकून होते, त्या उद्योगांना कोरोना संकटाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

Industry on track, idle hands at work | उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

उद्योग रुळावर, बेकार झालेले हात कामावर

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात कृषी क्षेत्रावर आधारित उद्योग सुरुकाही प्रमाणात सिमेंट पाईप, पॅकेजिंगचे उद्योगही सुरू झाले आहेत.

- प्रसाद आर्वीकर

परभणी : कोरोना आणि लॉकडाऊननंतर जिल्ह्यातील उद्योग हळूहळू रुळावर येत असून, बेरोजगार झालेल्या कामगारांना हातांना पुन्हा काम मिळू लागले आहे. ही प्रक्रिया संथगतीने असली तरी सकारात्मकतेकडे नेणारी आहे.

जिल्ह्यात आधीच मोठ्या उद्योगांचा वाणवा आहे. जे काही उद्योग टिकून होते, त्या उद्योगांना कोरोना संकटाचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सहा महिन्यांच्या खंडानंतर जिल्ह्यात कृषी क्षेत्रावर आधारित सोयाबीन प्रक्रिया, ऑईल मील, दालमील, कृषी अभियांत्रिकी हे उद्योग सुरू झाले आहेत. काही प्रमाणात सिमेंट पाईप, पॅकेजिंगचे उद्योगही सुरू झाले आहेत. जिल्ह्यात परभणी, गंगाखेड आणि जिंतूर या ठिकाणच्या औद्योगिक वसाहतीतील परप्रांतीय कामगार परतू लागले आहेत. 

एकंदर आढावा घेतला असता, ४० टक्के कामगार परतले आहेत. स्थानिक कामगारांपैकीही ७० टक्के कामगारांच्या हाताला काम मिळत आहे. जिल्ह्यात कृषीवर आधारित उद्योगांची संख्या अधिक आहे. काही प्रमाणात इतर उद्योग चालविले जातात. त्यापैकीही अनेक उद्योजकांनी पुन्हा कंपन्या सुरू केल्या आहेत. असे असले तरी पूर्वीप्रमाणे अद्यापही गती प्राप्त झाली नाही. मात्र उद्योगांवर आधारित असलेल्या कामगारांच्या हाताला काम मिळू लागले असून, परस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योजक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ही समाधानाची बाब ठरत आहे. 

जिल्ह्यात 2000 कोटींचा फटका 
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील औद्यागिक वसाहतींमधील  उद्योग जवळपास ठप्प होते. या काळात साधारणत: २ हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. या शिवाय आंतर जिल्हा आणि आंतर राज्य वाहतूक बंद असल्याने साधारणत: दीडशे ते दोनशे कोटी रुपयांच्या निर्यातीला फटका बसला.

कृषी क्षेत्रातील उद्योग सुरू 
परभणी जिल्ह्यात कृषी व्यवसायावर आधारित उद्योगांची संख्या अधिक आहे. त्यात सोयाबीन प्रक्रिया, ऑईल मील, दालमील आणि औजारे बनविणारे उद्योग व्यवसाय सुरू झाले आहेत. याशिवाय टायर रिमोल्डींग आणि पॅकेजिंगचे उद्योगही सुरू झाले आहेत. 

बंद असलेला उद्योग सुरू केला आहे. सध्या पाहिजे तेवढी व्यवसायात गती नाही. मात्र कामगारांचा रोजगार निघेल या दृष्टीने सुरूवात केली आहे. 
-आनंद भगत, उद्योजक

लॉकडाऊननंतर दालमील सुरू केली आहे. सद्यस्थितीत उत्पादन मर्यादित आहे. हळूहळू त्यात वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून कामगारांनाही रोजगार मिळत आहे.
-मनोज मुरक्या, उद्योजक

उद्योग सुरू झाले असले तरी अजून ते स्थिरावले नाहीत. शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे या उद्योजकांना भरीव मदत केल्यास हे उद्योग उभारी घेवू शकतील. 
-ओमप्रकाश डागा, उपाध्यक्ष, उद्योजक संघटना
 

Web Title: Industry on track, idle hands at work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.