भाजपामध्ये इनकमिंग सुरूच; २९ वर्षानंतर माजी आमदार सीताराम घनदाटांच्या हाती पुन्हा 'कमळ'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:22 IST2025-03-18T18:21:45+5:302025-03-18T18:22:34+5:30
गंगाखेड मतदारसंघ (राखीव) १९९० साली भाजपाने घनदाटांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. तसे ते भाजपापासून दुरावले होते.

भाजपामध्ये इनकमिंग सुरूच; २९ वर्षानंतर माजी आमदार सीताराम घनदाटांच्या हाती पुन्हा 'कमळ'
- प्रमोद साळवे
गंगाखेड ( परभणी) : गंगाखेडचे माजी आमदार तथा मुंबईच्या अभुदय बँकेचे संस्थापक चेअरमन सीताराम घनदाट यांनी मंगळवारी (दि.१८) रोजी प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत, परभणी जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने व शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. माजी आ.घनदाट यांनी तब्बल २९ वर्षानंतर स्वगृही अर्थात भाजपात प्रवेश करून कमळ हाती घेतले आहे.
गंगाखेड मतदारसंघ (राखीव) १९९० साली भाजपाने घनदाटांना विधानसभेची उमेदवारीची संधी दिली. त्यावेळी हा मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला होता. तत्कालीन आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड यांचेविरुद्ध घनदाट यांना पराभव स्वीकारावा लागला. पुढे घनदाट यांनीच शेकापचे मतदारसंघातील अस्तित्व संपविले. १९९५ पासून ते २०१४ पर्यंत घनदाटांनी सलग अपक्षपणे गंगाखेड विधानसभा लढविली. राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात मध्यंतरी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, तिकीट नाकारल्यामुळे २०१९ ची निवडणूक 'वंचित' कडून लढवली. गंगाखेडमधून घनदाट तीन वेळेस आमदार झाले.
मागील काही महिन्यांपासून घनदाट भाजपच्या संपर्कात होते. मंगळवारी अखेर त्यांनी मुंबईच्या भाजप मुख्य कार्यालयात प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी परभणी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, मुंबईचे माजी आ.कालिदास कोळंबकर, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, माजी मंत्री तथा आ.बबनराव लोणीकर, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर, जिंतूरचे माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, प्रा.भाई ज्ञानोबा मुंढे, गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, घनदाट यांचे नातू अमित घनदाट यांच्यासह घनदाट यांचे शेकडो समर्थक उपस्थित होते. माजी आ. घनदाट यांनी यावेळी भाजपच अधिकृत सदस्यत्व स्वीकारले.