पावसात बाभळीचा आडोसा ठरला जीवघेणा; वीज कोसळून शेतमालक, सालगड्याचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 18:35 IST2023-03-17T18:34:44+5:302023-03-17T18:35:11+5:30
शेतात काम सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला अन सर्वांनी बाभळीचा आडोसा घेतला

पावसात बाभळीचा आडोसा ठरला जीवघेणा; वीज कोसळून शेतमालक, सालगड्याचा जागीच मृत्यू
गंगाखेड - तालुक्यातील उखळी खुर्द शेत शिवारात वीज कोसळून शेत मालक व सालगडी यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन मजूर जखमी झाल्याची घटना आज ( दि.१७ ) सायंकाळी ४ वाजता घडली. शेत मालक बालासाहेब बाबुराव फड ( ५०), सालगडी परसराम उर्फ जयवंत गंगाराम नागरगोजे ( ४०) अशी मृतांची नावे आहेत.
उखळी खुर्द शेत शिवारात बालासाहेब फड यांचे शेत आहे. आज दुपारी फड, सालगडी जयवंत नागरगोजे आणि तीन मजूर शेतात काम करत होते. असताना पाऊस आल्याने मालकासह सालगडी, शेत मजुर बाभळीच्या झाडाखाली थांबले. दरम्यान, जोराच्या पावसाबरोबर कडकाडासह वीज बाभळीवर कोसळली. यात शेतकरी बालासाहेब फड आणि सालगडी जयवंत नागरगोजे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर राईबाई बाबुराव फड ( ७०), सतीश सखाराम नरवाडे ( ३५), राजेभाऊ किशन नरवाडे ( ४०) हे तीन मजूर जखमी झाले.
माहिती मिळताच गंगाखेड पोलिस ठाण्याच्या निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, बिट जमादार रंगनाथ देवकर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.