परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
By राजन मगरुळकर | Updated: November 12, 2025 17:31 IST2025-11-12T17:29:02+5:302025-11-12T17:31:23+5:30
परभणीतील जिंतूर रोड भागात सभेनंतर परतताना घडला प्रकार

परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
परभणी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणीत बुधवारी दुपारी शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यास आले होते. सभा संपल्यावर महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानातून बाहेर पडल्यावर त्यांच्या पायलट कॅनव्हाय व्हॅनमधील उपमुख्यमंत्र्यांचे वाहन आणि अन्य एक पोलिस वाहन वळण घेण्याऐवजी १०० ते २०० मीटर अंतर थेट पुढे गेले. परभणीतील उड्डाणपुलाकडे जाणाऱ्या मार्गावर ही दोन वाहने पुढे गेल्याने यंत्रणा गोंधळात पडली.
आपल्या मागे वाहनांचा ताफाच नसल्याने पुन्हा उपमुख्यमंत्र्यांचे वाहन विरुद्ध दिशेने येऊन परत पोलिस मुख्यालय मार्गावर जाणाऱ्या रस्त्याला लागले. त्यानंतर उर्वरित वाहनांचा ताफा त्यांच्या वाहनाच्या पाठीमागे आला आणि ते मुख्यालयातील हेलिपॅडकडे रवाना झाले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी ४.१० ते ४.१४ या वेळेत घडला. यामुळे पोलीस यंत्रणेची सोबत ताफ्यातील वाहनांची सुद्धा भंबेरी उडाली.
सभेचे स्थळ जिंतूर रोड भागातील महात्मा फुले विद्यालय मैदान हे होते. व्हीआयपी प्रवेशद्वार येथून उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सभेनंतर बाहेर पडला. त्यावेळी काही निवेदनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे वाहन समोर येताच त्यांना निवेदन देण्यासाठी गर्दी केली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सुद्धा निवेदनकर्त्यांना, नागरिकांना प्रतिसाद देत ही निवेदने वाहनाच्या समोरील बाजूस चालकाच्या शेजारी बसलेल्या जागेच्या खिडकीचा काच खाली करून स्वीकारली. त्यापूर्वी काही वाहने ही समोरील वळण रस्त्याने महाराणा प्रताप चौकाकडे गेली होती.
यातच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनासमोरील एक पोलिसांचे वाहन वळण घेण्याऐवजी थेट उड्डाणपुलाकडे जुनी जिल्हा परिषद इमारतीच्या मार्गाने शंभर ते २०० मीटर अंतर पुढे गेले. यानंतर रस्ता चुकल्याचे कळताच पुन्हा एकेरी मार्गाने विरुद्ध दिशेने हे वाहन परत महावितरणच्या मुख्य चौकापर्यंत आले आणि त्यानंतर उर्वरित वाहनांचा ताफा उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या पाठीमागे पोलिस मुख्यालयाकडे रवाना झाला. त्यामुळे या ठिकाणी काहीसा गोंधळ निर्माण झाला होता.