वाढत्या उन्हाचा वाहतुकीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:22+5:302021-04-02T04:17:22+5:30

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरातून दादराव प्लॉटकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे ...

Impact of rising sun on transport | वाढत्या उन्हाचा वाहतुकीवर परिणाम

वाढत्या उन्हाचा वाहतुकीवर परिणाम

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

परभणी : येथील प्रशासकीय इमारत परिसरातून दादराव प्लॉटकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने हा रस्ता उखडला असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर पथदिव्यांचीही सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळी अंधार पसरतो. त्यामुळे किरकोळ चोरीच्या घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.

विजेचा खांब बनला धोकादायक

परभणी : येथील शिवाजीनगर कॉर्नरवरील विजेचा खांब धोकादायक बनला आहे. हा खांब रस्त्याच्या बाजूने पूर्णतः वाकला असून, वाहनधारकांसाठी धोका निर्माण झाला आहे. महावितरण कंपनीने हा खांब बदलून घ्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

तपासणी अहवालांना विलंब

परभणी : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांना शोधण्यासाठी आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढविण्यात आल्या असल्या तरी या चाचण्यांचे अहवाल वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाने आरटीपीसीआर तपासण्यांचे अहवाल वेळेत द्यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.

उद्यानामधील खेळण्यांची दुरवस्था

परभणी : येथील राजगोपालाचारी उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. सध्या हे उद्यान बंद आहे. भविष्यात या उद्यानाचा वापर वाढविण्यासाठी मनपा प्रशासनाने तुटलेल्या खांबाची दुरुस्ती करून घ्यावी तसेच नवीन खेळणी बसवावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.

ग्रामीण भागात विजेचा खोळंबा

परभणी : ग्रामीण भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, दिवसभर कडक ऊन पडत आहे. त्याचप्रमाणे रात्रीही उकाडा जाणवत आहे. मात्र वीजपुरवठा खंडित झालेला असल्याने ग्रामस्थांना रात्र उकाड्यात काढावी लागत आहे. महावितरणने वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

सवारी गाड्यांअभावी विक्रेत्यांचे नुकसान

परभणी : रेल्वे प्रशासनाने अद्यापही सवारी रेल्वेगाड्या सुरू केल्या नाहीत. त्यामुळे तालुका स्तरावरून परभणी शहरात विविध व्यवसायानिमित्त येणाऱ्या लघू विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. या विक्रेत्यांना खासगी वाहनाने परभणी शहर गाठावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने सवारी रेल्वे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

परभणी : जिल्ह्यातील शासकीय कार्यालये ५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे गुरुवारी येथील सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहावयास मिळाला. गुड फ्रायडे, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन सुट्या आणि त्यात जिल्हा प्रशासनाचे आदेश असल्याने कार्यालय परिसरामध्ये शुकशुकाट निर्माण झाला आहे.

Web Title: Impact of rising sun on transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.