जिल्ह्यात अवैध वाहतूक तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:07+5:302021-04-14T04:16:07+5:30
उड्डाणपुलाजवळ विरुद्ध दिशेने वाहतूक परभणी : येथील उड्डाणपूल परिसरात विरुद्ध दिशेने सर्रास वाहतूक केली जात आहे. बसस्थानकाकडून गंगाखेड नाक्याकडे ...

जिल्ह्यात अवैध वाहतूक तेजीत
उड्डाणपुलाजवळ विरुद्ध दिशेने वाहतूक
परभणी : येथील उड्डाणपूल परिसरात विरुद्ध दिशेने सर्रास वाहतूक केली जात आहे. बसस्थानकाकडून गंगाखेड नाक्याकडे जाण्यासाठी उड्डाणपुलाच्या खालून रस्ता आहे. मात्र, रेल्वे गेट बंद असल्याने अनेकांना परत यावे लागते. तेव्हा मात्र सर्रास विरुद्ध बाजूने वाहतूक केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे.
मनपाच्या पथकाकडून कारवायांना फाटा
परभणी : शहरात अनेक नागरिक विनामास्क फिरत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई होत नाही. काही दिवसांपूर्वी महापालिकेने प्रत्येक प्रभाग समितीनिहाय पथकांची स्थापना केली होती. सुरुवातीचे काही दिवस या कारवाया करण्यात आल्या. मात्र, एका प्रभाग समितीचे पथक वगळता इतर पथकांकडून कारवाया होत नसल्याने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढली आहे.
शहरातील एटीएम केंद्रांमध्ये खडखडाट
परभणी : दोन दिवसांपासून बँकांना सुट्या असल्याने शहरातील अनेक एटीएम केंद्रांमध्ये पैशांचा खडखडाट निर्माण झाला आहे. बँका बंद आणि एटीएममध्येही पैसे नसल्याने ग्राहकांची तारांबळ होत आहे. त्यामुळे शहरात दिवसभर सुरू असलेले एटीएम केंद्र शोधताना ग्राहकांची चांगलीच धावपळ होत आहे.
शहरात बँकेसमोर ग्राहकांच्या रांगा
परभणी : शहरातील राष्ट्रीयीकृत बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. बाजारपेठ भागातील बँकांच्या परिसरात पुरेशी मोकळी जागा नसल्याने ग्राहक रस्त्यावर रांग लावून बँकेचे व्यवहार करीत आहेत. विशेष म्हणजे, यावेळी फिजिकल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बँक प्रशासनाने याकडे लक्ष देऊन फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
जलसाठा आटल्याने पाणीटंचाई वाढली
परभणी : प्रकल्पांमधील पाणीसाठा आटल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. प्रकल्पात पाणी शिल्लक असल्याने भूजल पातळी वाढलेली होती. मात्र, प्रकल्प तळाला गेल्यानंतर भूजल पातळीही खोल गेली असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.