'पैसे द्या नाही तर मोफत मासे नेणार'; खंडणी मागणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 12:36 IST2021-02-08T12:34:41+5:302021-02-08T12:36:08+5:30
Crime News लाशयात मत्स्य व्यवसाय करायचा असेल व तुझ्या संस्थेचे काम सुरळीत करायचे असेल तर आम्हाला नियमित पैसे द्यावे अशी धमकी दिली

'पैसे द्या नाही तर मोफत मासे नेणार'; खंडणी मागणाऱ्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
जिंतूर (जि. परभणी) : येलदरी जलाशयात मत्स्यव्यवसाय करायचा असेल तर नियमितपणे पैसे देऊन, मासे मोफत द्या, असे म्हणून खंडणी मागणाऱ्या नऊ जणांविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बामणी येथील सय्यद बाबू सय्यद महेबूब यांनी ही तक्रार दिली आहे. त्यानुसार तालुक्यातील येलदरी जलाशयात मत्स्य व्यवसायाचे कंत्राट स्व. राजीव गांधी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेला मिळालेला असून, या संस्थेचे अध्यक्ष सय्यद माबूद हे येलदरी जलाशयात मासेमारी करण्याचे काम करतात. मात्र, पांडुरंग नामदेव रणखांब, अमोल पांडुरंग रणखांब, श्रीरंग नामदेव रणखांब, लक्ष्मण लिंबाजी नेमाडे, (सर्व रा. बामणी, ता. जिंतूर), गणपत भिसे, छबूराव आगलावे (रा.परभणी), रामप्रसाद कांता कटारे (रा. कवठा बदनापूर), हिरामण मोहन लहिरे (रा. सावंगी भांबळे), जब्बारखा जिलानीखाँ यांनी सय्यद माबूद यांना येलदरी जलाशयात मत्स्य व्यवसाय करायचा असेल व तुझ्या संस्थेचे काम सुरळीत करायचे असेल तर आम्हाला नियमित पैसे द्या, अशी मागणी केली तसेच तलावावर काम करणाऱ्या लोकांना एकत्र जमवून संस्थेच्या विरुद्ध भडकून संस्थेच्या कामकाजामध्ये नेहमीच अडथळा निर्माण करत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून वरील नऊ जणांविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा नोंद झाला आहे.