'न्याय मिळाला नाही तर जीव देणार...'; मयत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांची उदविग्नता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:59 IST2025-01-31T14:59:14+5:302025-01-31T14:59:37+5:30
परभणी शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

'न्याय मिळाला नाही तर जीव देणार...'; मयत सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी यांची उदविग्नता
परभणी : मयत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला. सोमनाथच्या मृत्यूला दीड महिना उलटला तरी अद्यापही राज्य शासनाकडून पोलिसांवर गुन्हा नोंद झाला नाही. प्रशासन चौकशी सुरू आहे, असे नेहमीच सांगत आहे. न्याय मिळाला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जीव देणार, तेव्हांच प्रशासन माझी दखल घेईल, सध्या सरकार झोपेत असल्याची उदविग्नता मयत सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाबाई यांनी गुरुवारी व्यक्त केली.
मृत सोमनाथ सूर्यवंशी, विजय वाकोडे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना न्याय द्यावा आणि कोंबिंग कारवाईत मारहाण होऊन जखमी झालेल्या नागरिकांना न्याय देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील शनिवार बाजार मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
वंचित बहुजन आघाडीने काढलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये विजयाबाई सूर्यवंशी यांच्यासह कुटुंबीयसुद्धा सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आले असता विजयाबाई सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी न्याय मागणीसाठी दाद मागितली. यावेळी न्याय घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा सुद्धा त्यांनी दिला. यानंतर मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधला. वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदन दिले जात आहेत. मात्र, या निवेदनाला आणि यातील मागण्यांना जिल्हा प्रशासनाने गंभीरतेने पहावे. या निवेदनाला केराची टोपली दाखवू नये. न्याय मिळावा यासाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे सूर्यवंशी कुटुंबाने याप्रसंगी सांगितले.
मृत सोमनाथ सूर्यवंशी, आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे, सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला एक कोटी रुपये अर्थसाहाय्य देऊन परिवारातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या स्मारकाला शहरात जागा उपलब्ध करून द्यावी, मारहाण करणाऱ्या पोलिसांविरोधात तत्काळ गुन्हे नोंद करावेत, शिवाय अन्य १२ प्रमुख मागणी करण्यात आल्या. या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढला होता. राज्य शासनाने याबाबत योग्य ती कारवाई करावी व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले. मोर्चात राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राज्य महासचिव अनिल जाधव, अरुण जाधव, राज्य सदस्य अविनाश भोसीकर, धम्मपाल सोनटक्के, सुनील मगरे, तुकाराम भारती, सुनीता साळवे, रणजित मकरंद, तुषार गायकवाड, गणेश गाडे, प्रमोद कुटे, दिलीप मोरे, गौतम रणखांबे, शिवाजी वाकळे, चंद्रमोरे, माला साळवे, कमलेश ठेंगे, प्रमोद अंभोरे, अविनाश सावंत, आनंदा भेरजे यांच्यासह पदाधिकारी, नागरिक सहभागी झाले होते.