मुळी बंधाऱ्यास दरवाजे बसविल्यास ११ गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:37+5:302021-04-05T04:15:37+5:30
परभणी : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्यास दरवाजे बसविल्यास परिसरातील ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच ...

मुळी बंधाऱ्यास दरवाजे बसविल्यास ११ गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी
परभणी : गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्यास दरवाजे बसविल्यास परिसरातील ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच २ हजार हेक्टर जमिनीचे बारमाही सिंचन होईल. त्यामुळे या बंधाऱ्यास दरवाजे बसवावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्यात १०.३५ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होता; परंतु या बंधाऱ्यास बसविलेल्या स्वयंचलित दरवाजांपैकी ४ दरवाजे २०१२ मध्ये वाहून गेले. त्यानंतर खासगी एजन्सीमार्फत नवीन दरवाजे बसविण्यात आले. २०१६ मधील पुरामुळे बंधाऱ्याचे २० पैकी १६ दरवाजे वाहून गेले. त्यावेळेपासून या बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत नाही. येथे दरवाजे बसविल्यास परिसरातील ११ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. तसेच २ हजार हेक्टर जमिनीचे बारमाही सिंचन होईल. त्यामुळे हे काम खासगी एजन्सीऐवजी जलसंपदा विभागाच्या यांत्रिकीद्वारा निर्मिती मंडळ पुणे यांच्या अधिपत्याखालील कार्यालयाच्यावतीने करण्यात यावे. आजपर्यंत जलसंपदाच्या यांत्रिकी विभागानेच जायकवाडी, विष्णुपुरी, माजलगाव, निम्न दुधना, इसापूर प्रकल्प, पैठण डावा, उजवा कालवा आदी मराठवाड्यातील अनेक मध्यम प्रकल्पाचे गेट बसविण्याचे चांगले काम केले आहे, असेही या निवेदनात प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने म्हटले आहे.