आयसीयू,ऑक्सिजन बेडची कमतरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST2021-04-05T04:15:44+5:302021-04-05T04:15:44+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी व शासकीय रुग्णालयातील आयसीयू व ऑक्सिजन बेडची उपलब्ध संख्याही घटली आहे. ...

आयसीयू,ऑक्सिजन बेडची कमतरता
परभणी : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी व शासकीय रुग्णालयातील आयसीयू व ऑक्सिजन बेडची उपलब्ध संख्याही घटली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या आनुषंगाने अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात १ मार्च ते ४ एप्रिल या कालवधीत ७ हजार ५८५ काेरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच याच कालावधीत जिल्ह्यात १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दररोज ४०० ते ५०० कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे बाधित रुग्णांवर उपचार करताना आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. बहुतांश रुग्ण हे होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. असे असले तरी गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर शासकीय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासाठी अनेक रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. शहरातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ऑक्सिजनचे एकूण ३०८ बेड उपलब्ध करण्यात आले. त्यापैकी सद्य:स्थितीत १४३ बेड रिक्त आहेत. याशिवाय शहर व जिल्ह्यातील अन्य भागांतील दहा खासगी दवाखान्यांमध्ये १२५ बेड उपलब्ध होते. त्यापैकी फक्त २७ बेड सद्य:स्थितीत रिक्त आहेत. अशीच काहीशी परिस्थिती आयसीयूच्या बेड संदर्भातही आहे. शहरातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयसीयूचे ९२ बेड उपलब्ध करण्यात आले. त्यापैकी ६५ बेड सद्य:स्थितीत रिक्त आहेत, तर शहरासह ग्रामीण भागातील दहा खासगी रुग्णालयात आयसीयूच्या उपलब्ध असलेल्या १९५ बेडपैकी ३६ बेड रिक्त आहेत. विशेष म्हणजे दहा खासगी रुग्णालयांपैकी पाच रुग्णालयांत तर एकही बेड शिल्लक नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी विचार करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी कोरोनाच्या आनुषंगाने लक्षणे आढळून आल्यास तातडीने तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आजार अंगावर काढल्यास गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी नागरिकांनी दक्ष राहून काळजी घेणे अगत्याचे आहे.
सर्वसाधारण १७५ बेड रिक्त
परभणी शहरात आरोग्य विभागाच्या वतीने सहा ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीत दोन, जिल्हा सामान्य रुग्णालय, आयटीआय हॉस्पिटल, अक्षदा मंगल कार्यालय आणि रेणुका मंगल कार्यालय अशा एकूण सहा ठिकाणी ४३६ सर्वसाधारण बेड उपलब्ध करण्यात आले होते. त्यापैकी सद्य:स्थितीत १७५ बेड रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसाधारणमध्येही उपलब्ध बेडची संख्या घटली आहे.