‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:20 IST2021-05-25T04:20:13+5:302021-05-25T04:20:13+5:30
राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी किसान ॲप, शेतकरी मासिक, कृषिमित्र, एकात्मिक कीड व्यवस्थापन, वातावरण बदलातील माहिती, आदींसह २० प्रकारच्या ॲपमधून ...

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट !
राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी किसान ॲप, शेतकरी मासिक, कृषिमित्र, एकात्मिक कीड व्यवस्थापन, वातावरण बदलातील माहिती, आदींसह २० प्रकारच्या ॲपमधून माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यामध्ये महारेन मोबाईल ॲपच्या माध्यमातून मंडळ, तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील आजपर्यंतच्या पावसाची माहिती प्राप्त होते. तसेच काही ॲपच्या माध्यमातून खते, बियाणे व स्थानिक कृषी निविष्ठा विक्रेत्यांची माहिती मिळते.
कृषी विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, हरभरा या पिकांच्या कीड, रोग व त्यावरील उपाययोजनांची माहिती देण्यात येते; परंतु, किसान ॲपबाबत जिल्ह्यातील कृषी अधिकारी, कर्मचारी तसेच बहुतांश शेतकरीच अनभिज्ञ असल्याचे सोमवारी दिसून आले.
किसान ॲपवर काय मिळते माहिती?
महारेन मोबाईल ॲपच्या माध्यमातून मंडळ, तालुका, जिल्हा व विभाग स्तरावरील आजपर्यंतच्या पावसाची माहिती प्राप्त होते.
कृषी विभागाच्या वतीने अलीकडेच दामिनी ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून वीज नेमकी कोणत्या भागात पडणार आहे, याची माहिती दिली जात आहे.
वातावरण बदलाचा इशाराही दिला जातो
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्ह्यात होणाऱ्या पाऊस, वादळी वारा व विजांच्या कडकडाटाबाबत मोबाईलवर संदेशाच्या माध्यमातून माहिती दिली जाते. त्यामुळे आम्ही सतर्क होऊन शेतमाल व पिकांसाठी उपाययोजना करतो. त्यामुळे किसान ॲप आमच्यासाठी काही अंशी वरदान ठरते.
- अर्जुन नवघरे, शेतकरी
शेतकऱ्यांना त्यांचा माल विकता यावा, यासाठी केंद्र सरकारने किसान रथ ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून देशातील कोणत्याही शहरातील बाजारपेठेतील भाव माहिती करून घेता येत आहे. विशेष म्हणजे या किसान रथ ॲपमध्ये सात भाषांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे ते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरते.
- शिवाजी इक्कर, शेतकरी
माझ्या मोबाईलवर कृषी विषयक माहितीचे संदेश प्राप्त होतात. मात्र, बऱ्याचदा कनेक्टिव्हिटीअभावी हे संदेश उशिरा मिळत असल्याने वेळेत या माहितीचा उपयोग होत नाही. परिणामी या ॲपच्या माध्यमातून देण्यात येणारी कृषी विषयक माहिती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असली तरी केवळ कनेक्टिव्हिटीअभावी ती उशिराने मिळत आहे.
- संतोष वैद्य, शेतकरी
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी पारंपरिक शेती सोडून प्रयोगशील शेतीची कास धरीत आहेत. त्यामुळे कृषी विभाग व वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या ॲपमधून दिली जाणारी माहिती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे उपाययोजना केल्यास त्या फायदेशीर ठरतील.
- डॉ. संतोष आळसे,
जिल्हा कृषी अधीक्षक, परभणी.
अपडेट वेळेत मिळावे...
केंद्र, राज्य व कृषी विभागाच्या वतीने जवळपास २० ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विविध प्रकारची शेतीउपयोगी माहिती देण्यात येते; परंतु, ग्रामीण भागात मोबाईलला रेंज येत नसल्याने ही माहिती उशिराने प्राप्त होते. त्यामुळे ॲपच्या माध्यमातून मिळणारे अपडेट शेतकऱ्यांना मिळत नाहीत.